शिक्षण माध्यम प्रश्नावरून व गोवा प्रांतातून बाहेर पडलेले प्रा. सुभाष वेलिंगकर यांची पुन्हा ‘घरवापसी’ कधी होणार, यावर या घडीस तरी आपण काहीही भाष्य करू शकत नाही, असे कोकण-गोवा प्रांताचे संघचालक लक्ष्मण बेहरे व प्रा. रत्नाकर लेले यांनी सांगितले.
प्रा. वेलिंगकर यांनी सुरुवातीपासून निवडणूक झाल्यानंतर आम्ही सर्वजण एकत्र येणार असे सांगितले होते. गेल्या काही दिवसांपासून वेलिंगकर मूळ संघात जाणार अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी काल बेहरे व श्री. लेले यांना प्रश्न विचारले होते.
आज महत्वपूर्ण बैठक
दरम्यान, मूळ संघात प्रवेश करण्याच्या प्रश्नावर विचारविनिमय करण्यासाठी कोकण व गोवा प्रांत संघापासून फारकत घेतलेल्या स्वयंसेवकांच्या सुकाणू समितीची बैठक आज गुरुवारी होणार आहे. या बैठकीत वरील विषयावर चर्चा होणार आहे. प्रा. वेलिंगकर यांनी सद्यस्थितीत मूळ संघात जाऊ नये, असे मत अनेकजणांनी व्यक्त केल्याचे कळते.