वेलिंगकरांची अखेर पोलीस स्थानकात हजेरी

0
5

>> मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

>> प्रा. वेलिंगकरांची अटक टळली

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काल गुरूवारी प्रा. सुभाष वेलिंगकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलासा दिला. त्यानंतर प्रा. वेलिंगकर यांनी संध्याकाळी 4 वाजता डिचोली पोलीस स्थानकावर हजेरी लावली.

प्रा. वेलिंगकर यांच्या जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर काल उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. प्रा. वेलिंगकर यांना डिचोली पोलिसांनी बजावलेल्या तिसऱ्या नोटिशीला अनुसरून तपास कामात सहकार्य करायचे आहे. मात्र, पोलिसांकडून त्यांना अटक केली जाणार नसल्याची पोलिसांनी हमी द्यावी, असा युक्तिवाद वेलिंगकर यांच्यावतीने ज्येष्ठ वकील सरेश लोटलीकर यांनी सुनावणीवेळी गोवा खंडपीठात केला. सुभाष वेलिंगकर यांनी पोलिसांच्या नोटिशीला उत्तर दिले पाहिजे, असा युक्तिवाद पोलिसांच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने प्रा. सुभाष वेलिंगकर यांना संध्याकाळी 4 वाजता डिचोली पोलीस स्थानकात हजेरी लावण्याचा निर्देश दिला.

मंगळवारी सुनावणी

वेलिंगकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर येत्या मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. जामीन अर्जासंबंधी चार हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर काल सुनावणी झालेली नाही.
सुभाष वेलिंगकर यांनी लिखित स्वरूपात आपला जबाब दिला असून सदर जबाब तपास अधिकाऱ्याने नोंदवून घेतला आहे, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली. पोलीस स्थानकावर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वेलिंगकर यांना सोडण्यात आले. तपासणीसाठी आवश्यकता भासेल त्यावेळी वेलिंगकर यांना पुन्हा बोलावण्यात येणार आहे, असेही कौशल यांनी सांगितले.

आज हजर राहण्याची नोटीस
डिचोली पोलिसांनी प्रा. वेलिंगकर यांना आज शुक्रवारी चौकशीसाठी डिचोली पोलीस स्थानकात हजर राहण्याची नोटीस जारी केली आहे.

अर्ध्या तासात जबानी नोंदवली

सुभाष वेलिंगकर यांनी काल गुरुवारी दुपारी पावणेचार वाजता डिचोली पोलीस स्थानात हजेरी लावली. त्यानंतर पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक व निरीक्षक यांच्या उपस्थितीत वेलिंगकर यांची अंदाजे तीस मिनिटांत जबानी नोंद करण्यात आली. पोलीस ठाण्यात येताना वेलिंगकर हे मागच्या बाजूने पोलीस ठाण्यात दाखल झाले व जबानी देऊन समोरून अवघ्या 30 मिनिटांत एका वाहनातून रवाना झाले. यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वेलिंगकर यांना गुरुवारी संध्याकाळी 5 वाजण्यापूर्वी पोलीस ठाण्यात जबाब नोंदणीसाठी यायचे होते. त्यानुसार डिचोली पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पोलीस ठाण्याच्या बाहेर अनेक हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती लावली होती.