>> पार्क केलेल्या मैदानावरील गवताला आग लागून दुर्घटना
>> कोट्यवधींची हानी, कारण मात्र गुलदस्त्यात
वेर्णा येथे ‘रेनो’ कंपनीच्या कार पार्क केलेल्या मैदानावर असलेल्या वाळलेल्या गवताला आग लागून 33 गाड्या भस्मसात झाल्याची दुर्घटना काल मंगळवारी घडली. आगीत जळून खाक झालेल्या सर्व कार नव्या कोऱ्या होत्या. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेट येथे लागलेल्या या आगीत 33 गाड्या जळून भस्मसात झाल्या. काल मंगळवारी दुपारी 3.30 च्या सुमारास सदर आगीची दुर्घटना घडली. आगीत चारचाकी वाहनाच्या शोरुम परिसरात असलेली ‘स्टोअर रुम’ही जळून खाक झाली. या आगीत जवळपास कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
रेनो कंपनीचे शोरूम वेर्णा येथे आहे. त्यांच्या नवीन कार समोरील मैदानात पार्क केलेल्या असतात. गाड्या पार्क करून ठेवलेल्या मैदानावरील गवताला लागलेली आग गाड्यांपर्यंत पोहोचली व त्यात गाड्या भस्मसात झाल्या. आग लागल्याची माहिती मिळताच फोंडा, वास्को, वेर्णा व मडगाव येथील अग्निशामक दलांच्या बंबांना पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या बंबांनी तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
लोटली येथे जाणाऱ्या जुन्या रस्त्यावरील शोरुममध्ये ही घटना घडली. गवताला लागलेल्या आगीत जवळच पार्क केलेल्या शोरूममधील गाड्यांनी पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. त्यात 33 हून अधिक गाड्या पेटल्या. तर संबंधित कंपनीची स्टोअर रूमदेखील जळून खाक झाली. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. वेर्णातील रेनो आणि स्कोडाच्या सर्व्हिस सेंटरलाही आग लागली.
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत त्यांनी सदर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या घटनेमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून आग नेमकी कशी लागली याबाबत काही माहिती उपलब्ध झाली नाही.