>> डिस्चार्ज मिळताच पोलिसांची कारवाई; 4 दिवसांची पोलीस कोठडी
वेर्णा औद्योगिक वसाहतीतील रोझ बर्गर कंपनीच्या कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसच्या धडकेने शनिवारी रात्री 4 मजुरांचा मृत्यू झाला होता, तर चौघे जण जखमी झाले होते. या अपघातात चालक भरत गोवेकर हा देखील जखमी झाला होता. उपचारानंतर इस्पितळातून डिस्चार्ज दिल्यानंतर वेर्णा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. यानंतर त्याला प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
शनिवारी रात्री 11.30 च्या सुमारास वेर्णा औद्योगिक वसाहतीतील रोझ बर्गर कंपनीतील कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी नियुक्त केलेल्या खासगी बसच्या (क्र. जीए-05-टी-4777) चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला. वळणावर त्याने बस न वळवता थेट रस्त्याबाजूला उभारलेल्या झोपड्यांमध्ये घुसवली. सदर तीन झोपड्यांवरुन बस गेली. त्यात तिघा मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा इस्पितळात नेताना मृत्यू झाला. तसेच या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले होते.
या अपघातात विनोद राजपूत (60), राजेंद्र महतो (60), रमेश मंडल (60), अनिल महातो (35) या बिहार येथील चार मजुरांचा मृत्यू झाला होता, तर तुना कुमार (22), दिनेश महतो (25), सुरेश सिंग (25), राजेश कुमार (23) हे जखमी झाले होते.
अपघातावेळी बसचालक भरत गोवेकर हा मद्याच्या नशेत असल्याची माहिती समोर आली होती. अपघातानंतर त्याची तपासणी करण्यात आली होती. त्या चालकाचा अल्कोहोल चाचणी अहवाल अद्याप मिळाला नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
वेर्णा येथील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या उर्वरित दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आणि नंतर त्यांच्या गावी पाठविण्यात आले. सोमवारी दोघांचे मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आले होते.
या अपघातात चौघा जखमींपैकी आणखी दोघांची प्रकृती स्थिर झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याचे वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी सांगितले.