वेंगुर्ल्यातील पर्यटकांना मारहाण प्रकरणी चौघांना अटक

0
1

भोम-पालये पठारावरील घटना; उघड्यावर मद्यपान केल्याने घडला प्रकार

ेंगुर्ला-सिंधुदुर्ग येथून गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना भोम-पालये येथील पठारावर बेदम मारहाण करण्याचा बुधवारी सायंकाळी उशिरा घडला होता. या घटनेत चार पर्यटक गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी मांद्रे पोलिसांनी काल चौघा संशयितांना अटक केली. ब्रिजेश वस्त (30), फ्लॉयड डिसोझा (34), सुनील गावडा (43, तिघेही रा. हरमल) आणि दिप्तेश पोळजी (26, रा. कोरगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेंगुर्ल्यातून आलेले काही पर्यटक भोम-पालये येथे सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान करत होते. त्यावेळी सदर चार संशयितांनी त्यांना जाब विचारला. त्यावरून दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाली आणि नंतर त्याचे पर्यावसान मारामारीत झाले. स्थानिकांनी पर्यटकांना बेदम चोप दिला, त्यात चार पर्यटक गंभीर जखमी झाले. जखमींना सुरुवातीला उपचारासाठी तुये येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले. रात्री उशिरा त्यांना पुढील उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. ही घटना समोर आल्यानंतर मांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

या प्रकरणी वेंगुर्ला सिंधुदुर्ग येथील रिचर्ड मॅन्युअल डिसोजा यांनी काल मांद्रे पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी सायंकाळी 6 च्या सुमारास ते आपल्या मित्रांसोबत भोम-पालये येथे आले होते. त्या ठिकाणी संशयित ब्रिजेश वस्त, नाना साटेलकर व इतर चार-पाच अनोळखी व्यक्तींनी आपणास मारहाण केली. याशिवाय आपले मित्र आनंद डिचोलकर, ऑल्विन फर्नांडिस यांनाही शिवीगाळ व मारहाण केली. याशिवाय आपल्या दुचाकी व मोबाईलचेही संशयितांनी नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मांद्रे पोलिसांनी संशयितांविरोधात भारतीय दंड संहिता कलम 352, 118 (2), 324(4) व (5) नुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जयदीप पालेकर पुढील तपास करीत आहेत.