- अनुराधा गानू
बर्याच गोष्टींसाठी ते मुलावर अवलंबून असतात, त्यांच्या ज्येष्ठतेचा फारसा आदर होत नाही. त्यांनी केलेल्या चांगल्या कामापेक्षा त्यांच्या चुकांचा हिशोब आधी मांडला जातो, अगदी नातवंडांकडूनसुद्धा! अशा वृद्धांचं वृद्धत्व मात्र कंटाळवाणं होतं. त्यांच्या मनात सतत मिंधेपणाची बोच असते.
वृद्धत्व, प्रौढत्व म्हणजे नक्की काय हो? म्हातारपण? वय वाढणे? परिपक्वता? ज्येष्ठत्व?… तसं म्हणाल तर वृद्धत्वाची निश्चित अशी व्याख्या नाही करता येणार, कारण काही वेळेला वय न वाढताही माणसं अकालीच वृद्ध होतात. काही लोक परिस्थितीमुळे खूप समंजस होतात. त्यांचे विचार परिपक्व होतात. त्याला आपण अकाली वृद्धत्व म्हणतो. मग त्याचं वय वाढलेलं नसतानासुद्धा त्यांना वृद्ध म्हणायचं का? पण वृद्धत्व हे मुळी फक्त वयावर अवलंबून नसतंच. वृद्धत्व हे प्रत्येक माणसाच्या शारीरिक, आर्थिक, मानसिक परिस्थितीवर आणि एकंदरच घरच्या आणि आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून असतं. माणूस जर शारीरिक, मानसिकदृष्ट्या चांगला असेल आणि घरातलं वातावरण आनंदी असेल तर ती माणसं वय झालं तरी वृद्ध होत नाहीत.वय झालेल्या माणसांना वृद्ध किंवा म्हातारे न म्हणता ज्येष्ठ म्हणायची पद्धत अलीकडे सुरू झालीय. आता वय वाढलं की कामाच्या ठिकाणी आणि घरातही निवृत्ती आपोआप येतेच आणि शरीर थकलं की परावलंबित्वही आपोआप येतंच हे सांगण्याची गरज नाही.
बर्याच वेळा ६५-७० वर्षे वयाची माणसं कंटाळलेली दिसतात. त्यांच्या तोंडून नेहमीच… ‘‘पुरे रे बाबा आता, परमेश्वरा. आणखी किती जगायचं रे?’’असा सूर बाहेर पडताना दिसतो. कारण ती माणसं आयुष्याचा सतत नकारात्मकच विचार करत असतात. पण जी माणसं आयुष्याचा सकारात्मक विचार करतात तेव्हा ती वृद्धत्वसुद्धा एन्जॉय करतात. त्यांचं म्हणणं असतं, ‘‘अरे आता हीच तर वेळ आहे आपलं आयुष्य आपल्या मर्जीप्रमाणं जगण्याची. आत्तापर्यंत प्रापंचिक जबाबदार्या होत्या. त्या पेलताना, दुसर्यासाठी जगताना, स्वतःसाठी जगायचं राहूनच गेलं होतं. आतापर्यंत जे जे नाही करता आलं ते ते आता करायचं ठरवलं आहे. उपभोगणार आहे’’. अशा सकारात्मक विचारांची माणसं वृद्ध होतच नाहीत.
माझी एक मैत्रीण आहे. वय वर्षे ८२. घरी एकटीच राहते. घरातली सगळी कामं, अगदी केर वारे सुद्धा स्वतःच करते. बागेची निगा राखते. कोठेही जायचं असलं की अगदी तिकीट बुकिंगपासून बसने, रेल्वेने, विमानाने सगळीकडे एकटीच प्रवास करते. पुन्हा नवीन नवीन काही बघण्याची, करण्याची, शिकण्याची हौस आहेच. दुपारी थोडी विश्रांती घेतली की पुन्हा संध्याकाळी उशिरापर्यंत पत्त्यांचा अड्डा आहेच. या वयातसुद्धा तिला कोणी वृद्ध नाही म्हणणार. माझा भाऊ वय वर्षे ८५. ऐकू कमी येतं. डोळ्यांच्या तक्रारी असतातच. पण त्याची कशाबद्दलही तक्रार नाही. कायम लोकसेवेत मग्न असतो. स्वतःची घरची आणि बाहेरची कामंही स्वतःच करतो. कधीही विचारा, ‘‘कसा आहेस तू?’’ ‘‘उ ऽ त्त ऽ म’’ असंच उत्तर मिळणार. खरंच, अशा विचारसरणीची माणसं कधी वृद्धच होत नाहीत.
याच्या उलट नकारात्मक विचार करणारी… प्रत्येक वेळी तक्रारीचा सूर आळवणारी माणसं… शारीरिकदृष्ट्या चांगली असूनसुद्धा त्यांना मानसिक प्रौढत्व येतं. काही माणसं आर्थिक परिस्थितीमुळे निराश झालेली असतात. असं नैराश्य एकदा आलं की माणसाची उमेद कमी होते आणि माणूस प्रौढत्वाकडे झुकू लागतो. किंवा कायम कसल्यातरी ताणतणावाखाली वावरणारी माणसं किंवा अंगावर सतत जबाबदार्यांचं ओझं बाळगणारी माणसं अशीच थकून जातात. त्यांच्यामध्ये काही करायची जिद्द उरतच नाही. अशी माणसंही अकाली प्रौढत्वाकडे झुकतात.
वृद्धत्व हे वेगवेगळ्या माणसांकडे वेगवेगळं असतं. ते त्याच्या घरगुती, मानसिक, सामाजिक आणि एकंदरच वातावरण आणि परिस्थितीवर अवलंबून असतं. जी वृद्ध माणसं स्वतःच्याच घरात राहतात आणि मुलं त्यांच्याकडे असतात तेव्हा ते घर मुलांसकट सर्वांचं असतं. ज्यांना पेन्शन असते, ते आर्थिकदृष्ट्या तरी मुलांवर अवलंबून नसतात. उलट घरात थोडीफार मदतच होते. त्या वृद्धांना घरात मान असतो. त्यांच्या ज्येष्ठतेचा आदर असतो. अशा लोकांचं वृद्धपणसुद्धा आनंदी असतं. पण जे वृद्ध मुलांच्या घरात राहतात, त्यांचं वृद्धत्व थोडंसं वेगळं असतं, बर्याच गोष्टींसाठी ते मुलावर अवलंबून असतात, त्यांच्या ज्येष्ठतेचा फारसा आदर होत नाही. त्यांनी केलेल्या चांगल्या कामापेक्षा त्यांच्या चुकांचा हिशोब आधी मांडला जातो, अगदी नातवंडांकडूनसुद्धा! अशा वृद्धांचं वृद्धत्व मात्र कंटाळवाणं होतं. त्यांच्या मनात सतत मिंधेपणाची बोच असते.
काहीही असो. एकदा का तुमच्यावर वृद्धत्व, म्हातारपण, ज्येष्ठत्व हा शिक्का बसला की थोडी सावधगिरी बाळगणे जास्त चांगलं नाही का? सावधगिरी म्हणजे काय? हो. अनेक ज्येष्ठ लोकांच्या बघितलेल्या अनुभवावरून एक कानमंत्र देऊन ठेवते. करा कान इकडे….
जे जे दिसेल ते ते पहावे | ताटी पडेल ते ते खावे
न झाल्या मनासारखे | गप्प रहावे ॥
विचारल्यावीण सल्ला देऊ नये | मागितल्यावीण मदत करू नये |
शिस्त लावण्या नातवंडांना | विचारसुद्धा करू नये ॥
प्रश्न फार विचारू नये | व्यर्थ वटवट करू नये|
बर्फ डोक्यावर साखर जिभेवर | ठेवावा ताबा मनावर |
चित्ती असू द्यावे समाधान
बघा, पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. सांगायचं माझं काम मी केलंय.