वृक्षवल्ली आम्हां सोयरे…

0
40
  • सीताकांत घाणेकर

योगसाधना- ५४६
अंतरंगयोग- १३१

आपल्या ऋषिमुनींचे मन व विचार स्वच्छ, पवित्र होते. त्यांची बुद्धी तेजस्वी होती, हृदय संवेदनशील होते. त्यामुळे जेव्हा ते ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणतात त्यावेळी फक्त मनुष्याचे कुटुंब त्यांना अभिप्रेत नाही तर अखंड विश्‍व व त्यातील घटक आहेत. प्रत्येक घटकाची ते कृतज्ञता व्यक्त करतात.

भारत देश महान आहे. पुण्यभूमी आहे. सर्व दृष्टीने, प्रत्येक घटकामध्ये हा देश अत्यंत समर्थ होता. इतिहास साक्ष आहे. इतिहासकार या राष्ट्राचे वर्णन करताना सांगतात की इथून सोन्याचा धूर निघत होता. म्हणजे आर्थिकदृष्ट्या भारत देश फार प्रगत होता. तसाच आध्यात्मिक क्षेत्रातदेखील पुढे होता.
या पुण्यभूमीत ज्ञानी ऋषी-महर्षी, महान तत्त्ववेत्ते, शूर, दानशूर, धर्मवीर राजेमहाराजे जन्मले. येथील पर्वत, नद्यादेखील अत्यंत पवित्र मानल्या जातात. म्हणूनच कदाचित भगवान विष्णूला अवतार घेण्याचा मोह झाला असेल. अवश्य प्रत्येक अवतारात- मत्स्य ते बुद्ध- विविध संदेश भगवंताने दिले आहेत. वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध… हे तर मनुष्यरूपांतलेच अवतार आहेत.

भगवंताला भूमी पावित्र्यामुळे येथे अवतरण करण्याचा मोह झाला. येथे येऊन देव अनेक चांगल्या गोष्टी शिकवून गेले. पण तसाच मोह परकीयांनादेखील झाला. त्यांचे लक्ष आपल्या भौतिक संपत्तीवर होते. त्यामुळे अनेक आक्रमणे भारतावर झाली. विविध भयानक अत्याचार झाले. धर्मांतरे, लढाया, लूट… आपल्या चांगुलपणाचा फायदा या आक्रमकांनी घेतला. संपत्ती लुटली, मंदिरे-मूर्ती तोडल्या, मौलिक ग्रंथसाहित्य जाळले, विद्यापीठे उद्ध्वस्त केली… अवश्य, अनेक राजांनी प्रतिकार केला. थोडेफार यश मिळाले. पण भारताने कुणावरही आक्रमण केले नाही. उलट या परकीयांना आपल्यात सामावून घेतले. प्रेम, सहकार्य, दया, क्षमा… याचा संदेश विश्‍वाला दिला.
सर्वांना आपलेसे करून ‘वसुधैव कुटुंबकम’चा नारा दिला. मोडकी-तोडकी संस्कृती जमेल तशी सांभाळून जिवंत ठेवली. आता ती पुन्हा सर्व विश्‍वात प्रस्थापित होत आहे. याचे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे भारताबाहेरील देशांत दिसत असलेले विविध घटकांचे अस्तित्व- वेद, उपनिषद, गीता, योग, आयुर्वेद, संस्कृत, भारतीय जीवनपद्धती…
आपल्या ऋषींचे मन व विचार स्वच्छ, पवित्र होते. त्यांची बुद्धी तेजस्वी होती, हृदय संवेदनशील होते. त्यामुळे जेव्हा ते ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणतात त्यावेळी फक्त मनुष्याचे कुटुंब त्यांना अभिप्रेत नाही तर अखंड विश्‍व व त्यातील घटक आहेत. त्यामुळे प्रत्येक घटकाची ते कृतज्ञता व्यक्त करतात.

  • पंचमहाभूते- वृक्ष, वनस्पती, प्राणी, पक्षी…
    त्यांना पूज्य मानून त्यांची पूजा करतात. त्यांना प्रेम-माया देतात.
    तुकाराम महाराजांसारखे म्हणूनच म्हणतात ः ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे-वनचरी…’
    आपल्या ऋषींचे आश्रम (विद्यापीठे) घनघोर जंगलात निसर्गाच्या सान्निध्यात होते. सर्व सृष्टीशी त्यांनी आत्मीयता, ऐक्य साधले होते. त्यांच्याशी दैवी नाते जोडले होते. जीवनाचे अनेक पाठ त्यांनी त्यांच्याकडून घेतले होते.
    परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यासंदर्भात अनेक मौलिक विचार देतात.
  • आपल्या पूर्वजांनी वृक्ष-वनस्पतीवर प्रेम केले. स्वतःचा सहोदर मानून स्नेहाचे त्यांच्यावर सिंचन केले. शंकराने ज्याला पुत्रवत मानले अशा देवदाराच्या वृक्षाला पार्वतीने स्वतः जलसिंचन करून वाढवले आहे.
  • येथे शास्त्रीजी कालिदासाने रघुवंशात केलेले स्मरणीय वर्णन नोंद करतात.
    ‘अमुं पुरः पश्यसि देवदारुं पुश्रीकृतौऽसौ वृषभध्वजेन|
    यो हेमकुम्भस्तननिःसृतानां स्कदस्य मातुःपयसां रसज्ञः॥
  • आश्रमातील वृक्ष-वनस्पतींना तेथील सर्वजण प्रेमाने वागवीत असत. इथे शास्त्रीजी वरतंतूचा शिष्य कौत्स जेव्हा राजर्षी रघूजवळ येतो तेव्हा रघुराजाने वृक्षांचे कसे कुशल विचारले ते निवेदन करतात ः
    आधारबन्धुप्रमुखैः प्रयत्नैः संवर्धितानां सुतनिर्विशेषम्‌॥
    कच्चिन्न वाच्वादिरूपप्लवो वः श्रमच्छिदामाश्रमपादपानाम्‌॥
  • ‘‘आश्रमातील वृक्ष- ज्यांना तुम्ही कुंपण करून पुत्राप्रमाणे जतन करून वाढविले आहे, तसेच ज्यांच्याकडून पथिकांना छाया मिळते, त्या वृक्षांची वादळ किंवा तुफान आदी उपद्रवांपासून हानी झालेली नाही ना?’’
    ही घटना अत्यंत हृदयंगम व बोधदायक आहे. मानवाप्रमाणेच वृक्षांचेदेखील कुशल विचारले जात असे.

प. पू. पांडुरंगशास्त्रींच्या स्वाध्याय परिवारामध्ये ‘वृक्षमंदिर’ म्हणून शेतकर्‍यांसाठी एक उत्तम प्रयोग आहे. तिथेदेखील वृक्षातील वासुदेव बघायला शास्त्रीजी सांगतात. त्यामुळे या वृक्षांना सांभाळण्यासाठी माळी नाही तर वृक्षमंदिराचे पुजारी- स्वाध्याय परिवारातले बंधू-भगिनी आहेत. विविध दांपत्ये आळीपाळीने नियमित प्रेमाने ही पूजा करतात.
यासंदर्भात शास्त्रीजी शकुंतलेबद्दल सांगतात- शकुंतला जेव्हा झाडांना पाणी घालते त्यावेळी तिची सखी अनुसुया तिला म्हणते ः
‘‘कण्व बाबांना तुझ्यापेक्षा हे वृक्ष अधिक प्रिय आहेत. म्हणूनच तुला झाडांना पाणी घालायला सांगतात.’’
तेव्हा शकुंतला भाववश होऊन म्हणते ः
न केवल तात नियोग एव|
अस्ति मे सोदरस्नेहोऽप्येतेषु॥

  • ‘‘कण्वबाबांनी आज्ञा केली म्हणूनच काही मी वृक्षांना पाणी घालीत नाही तर झाडांवर माझे सख्ख्या भावासारखे प्रेम आहे म्हणून मी पाणी घालते.’’
    खरेच, हा प्रसंग अगदी भावनिक आहे. तो काळ, ती माणसे, ते संस्कार… वेगळेच होते. आताची बहीण खर्‍या सख्ख्या भावावर तरी इतके प्रेम करते का? अनेकजण भौतिक संपत्तीच्या व्यवहारात आणि वादळात एवढे गुंतून पडले आहेत की त्यांची भेट कोर्टामध्येच होते. अपवाद आहेच. शेवटी काय? ‘कालाय तस्मै नमः’
  • हे कलियुग आहे. सत्ययुग थोडेच आहे. असे म्हणून आपणांतील बहुतेकजण समाधान मानतात(!)
    शकुंतला जेव्हा सासरी जायची असते तेव्हा महर्षी कण्व तिला वृक्षांना निरोप द्यायला सांगतात ः
    पातुं न प्रथमं व्यवस्यति जलं युष्मारस्वपीतेषुु या|
    नादत्ते प्रियमण्डनापि भवतां स्नेहेन या पल्लवम्‌|
    आधे वः कुसुमप्रसूतिसमये यस्या भवत्युत्सवः|
    सेथं याति शकुन्तला पतिगृहं सर्वैरनुज्ञायताम्‌॥
  • ‘‘तुम्हाला देण्यापूर्वी जी पाणी पिण्याचा प्रयत्न करीत नाही, शृंगार आवडत असला तरी जी तुमच्यावरील प्रेमामुळे पानेही तोडीत नाही, तुमच्या पहिल्या मुलाच्या वेळी जी उत्सव साजरा करते ती ही शकुंतला पतीच्या घरी जात आहे. सर्वजण आज्ञा द्या.’’
    महाकवी कालिदासांचे असे साहित्य वाचले की हृदय भरून येते, डोळ्यांत अश्रू येतात. त्यावेळची भावनिक दृष्ये डोळ्यांसमोर येतात.
    अशी आहे आपली भारतीय संस्कृती-
    शास्त्रीजींच्या शब्दांत-
    १) चराचर सृष्टीवर प्रेम करायला शिकवणारी भारतीय संस्कृती आहे. २) सर्वत्र कृतज्ञता प्रकट करणारी ही महान संस्कृती आहे. तिच्या अंतरात्म्याला पारखण्याची गरज आहे. ३) आपणही तसे भावपूर्ण अंतःकरण फुलवूया. ४) मानव मात्रावर तर प्रेम करूयाच, परंतु भावनेला तेवढ्यापुरते सीमित न ठेवता पशुसृष्टीवर आणि वृक्षवनस्पतीवर प्रेम करायला लागलो तर नंदनवन येथेच निर्माण होईल.

विज्ञानानेदेखील विविध प्रयोगांद्वारे वनस्पतींना भावना आहेत हे सिद्ध केलेले आहे. त्यांची पाने, फुले, फळे तोडताना एका हाताने फांदी पकडून दुसर्‍या हाताने ती तोडली तर त्यांना आपला भाव कळेल. आपल्या मातेपासून दूर होण्याचे दुःख होईलच, पण आपण प्रेमाने त्यांना हाताळले, कुरवाळले तर तेवढेच सुख-समाधान त्यांनादेखील होईल.
माझा स्वभाव भावनाप्रधान आहे, म्हणून त्यांना खतपाणी घालताना, फुले-फळे तोडताना, रोग झाला तर औषध लावताना अथवा तो भाग कापताना त्यांच्याकडे मी बोलतो, प्रेमाने संवाद साधतो. त्यांना सांगतो की ही फुले आम्ही देवपूजेसाठी वापरतो. तसेच दुसर्‍या दिवशीचे निर्माल्यदेखील हळुवारपणे काढून परत झाडाच्या मुळाशी घालतो.
ती आमच्याशी बोलत नाहीत. पण मला मानसिक व आत्मिक समाधान लाभते.
आपले योगसाधकदेखील हे विविध सुंदर विचार आपल्या आचरणात आणतच असतील.
(संदर्भः प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले- संस्कृतीपूजन)