वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें

0
245
  •  डॉ. सोमनाथ कोमरपंत

सुष्ट-दुष्ट प्रवृत्ती निसर्गाकडूनच माणसाला लाभलेल्या आहेत. हे जैविक नाते अभेद्य आहे. त्यामुळे निसर्गाशी समतानता साधून सुष्ट प्रवृत्तींचे उन्नयन करणे आणि दुष्ट प्रवृत्तींचे दमन करणे माणसाच्या अधीन आहे. माणूस संस्कृतिप्रिय असल्यामुळे त्याला ते शक्य आहे.

भवतालाचा ताल, तोल आणि लय सांभाळायला वृक्ष कशी मदत करतात हे अधोरेखित करण्याची आवश्यकता नाही. वैज्ञानिकांनी ते सिद्ध करून दाखवले आहे. लेखक-कवींनी वृक्षवेलींचा त्याबद्दल गौरव केला आहे. ही परंपरा आजकालची नाही. महाकवी वाल्मीकींनी ‘रामायणा’मध्ये केलेले सृष्टिवर्णन यासंदर्भात आठवते.

कालिदासाचे ‘ऋतुसंहार’ तर विश्‍वमान्य झाले आहे. सृष्टिचक्राशी एकतान झालेला हा प्रतिभावंत कवी आहे. हे काव्य आजही ताजेतवाने वाटते. कालिदासाने निसर्गाशी रममाण होणे यात काही नवल नाही. पण प्रपंचाकडे पाठ फिरवून परमार्थमार्गाकडे वळलेल्या ज्ञानदेव, तुकाराम आणि रामदास यांनादेखील त्याचा लळा लागला होता हे त्याच्या काव्यातून प्रकट झालेले दिसते. या निःसंग वृत्तीच्या संतपुरुषांनाही निसर्गाचा सहवास हवा होता. ती एकच चीज जगात अशी आहे की ती संत्रस्त व्यक्तीला संतुष्ट करू शकते. झाडाच्या पर्णांतील हरितद्रव्य नेत्रांना निरामयता प्राप्त करून देते असे विज्ञान सांगते. पावसाळ्यातील हिरवागार डोंगरमाथा, पायथ्याशी असलेली उत्तुंग वृक्षांची रांगच रांग, सभोवताली पसरलेले हिरवे शेत आणि माथ्यावरचे विशाल आभाळ पाहून ज्याची चित्तवृत्ती प्रसन्न होत नाही असा माणूस सापडणे कठीण. लोकान्तामधील एकान्त सेवन करायचा असेल तर निसर्गाची साथसंगत हवीच. ऋषिमुनींनी तपःसाधना केली ती मनुष्यवस्तीपासून दूर असलेल्या अरण्यातच. ती परंपरा अलीकडच्या संत-महंतांपर्यंत चालू राहिली. ज्ञानदेव हे योगी पुरुष. पण ‘ज्ञानदेवी’तील निसर्गानुभूतीचे उत्कट रंग आणि तिच्यातील प्रतिमामालिकांचे रूपसौंदर्य पाहिले की ऐहिकतेपासून लांब राहिलेल्या या कुमारयोग्याने निसर्गसौंदर्याचा आस्वाद किती मनस्वी वृत्तीने घेतला होता याचा प्रत्यय येतो. त्याच्या अनुभूतीत निसर्गरंग भिजून गेलेले आहेत. पण भंडार्‍याच्या डोंगराच्या सान्निध्यात राहून निरंतर चिंतन करणार्‍या निरिच्छ तुकारामांनी निसर्गसहवास आपल्याला किती प्रिय आहे याचा निखळ शब्दांत उल्लेख केला आहे ः
वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें| पक्षी ही सुस्वरें आळविती॥
येणें सुखें रूचे एकांताचा वास| नाहीं गुण दोष अंगा येत॥
आकाश मंडप पृथुवी आसन| रमे तेथें मन क्रीडा करी॥
कथाकमंडलु देहउपचारा| जाणवितो वारा अवसरू॥
हरिकथा भोजन परवडी विस्तार| करोनि प्रकार सेवुं रूची॥
तुका म्हणे होय मनासी संवाद| आपुला चि वाद आपणांसी॥
‘आकाश हा मंडप आहे आणि पृथ्वी हे बसण्याचे आसन आहे, म्हणून जेथे आमचे मन रमेल तेथे आम्ही क्रीडा करू’ असे आत्मनिर्भर मनाने सांगणारे तुकाराम केवढे विशाल क्षितिज आपल्या कवेत घेतात आणि ते किती ममत्वाने घेतात हे बघण्यासारखे आहे. हा अनुभूतीचा विषय आहे; केवळ अर्थ लावण्याचा नाही.

‘दास डोंगरीं राहतो| चिंता विश्‍वाची वाहतो’ असे म्हणणारे समर्थ रामदास गिरीच्या मस्तकावरून वाहणारी ‘गंगा’, शिवथर घळ आणि डोंगरकपारीवरून धबाबा उडी घेणारे प्रपात पाहून त्या अभिजात रसवृत्तीत तन्मय होतात. हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे रूप अनोखे वाटते. अनवट वाटते.

निसर्गाच्या रूपलावण्यामुळे महाकाव्याचे रसमयतेने ओथंबलेले सर्गच अनुभवल्याचे समाधान मिळते. सुंदरवाडी अथवा सावंतवाडीच्या दिशेने जात असताना इन्सुली लागते. सातजांभळीचा परिसर लागतो. कोलगावचे दाट जंगल लागते. मार्ट, किंजळ, सागवान, शिसव, खैर, अर्जुन इत्यादी वृक्षविशेषांनी संपन्न झालेले जंगल पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. मालगुंडला केशवसुतांच्या गावात गेल्यावर ‘नैऋत्येकडला वारा’ या कवितेतील संस्मरणांचे आपल्याही मनात संक्रमण होते. मंत्रभारल्यागत आपण केशवसुतांच्या काव्यस्रोताशी एकरूप होतो.

कवी माधवांनी ‘हिरवें तळकोकण’ या कवितेत तत्कालीन तळकोकणप्रदेशातील वृक्षविशेषांचे प्रत्ययकारी चित्रण केले आहे. ते उत्कृष्ट चित्रकार होते. चित्रातील रंगविभ्रम त्यांनी येथे कवित्वशक्तीत मुरवून घेतले आहेत असे वाटते. या वृक्षविशेषांत आंबा, आवळी, जांभूळ, पिंपळ, वड, बेहडा, सात्विण, पांगारा, शेवरी, फणस, चिंच, रातंबी, औदुंबर, भेंडी, उंडीण, आइन, किंजळ या वृक्षांचा समावेश आहे. शिवाय विविध प्रकारची वेलीफुले आहेत. ही सारी गजबजलेली सृष्टी मानवी भावभावनांनी मूस आहे. कवी या सार्‍या भावचित्रांशी एकरूप झालेला आहे.

वार्‍याच्या लयीबरोबर डुलणार्‍या वृक्षांचे नर्तन पाहत असताना आपल्या मनात बालपणीचा स्मृतिजागर होतो. हे बालपणातील नंदनवन सुखसंवेदना निर्माण करणारे असते. घरात आरामखुर्चीत पहुडणे हे आपल्याला पसंतच नसायचे मुळी. मोकळ्या आकाशाशी आपला संवाद चालायचा. विसावण्याची जबरदस्त इच्छा झाली की झाडच लागायचे. मुक्त मन नाना गोष्टींत विहार करायचे ते येथेच. ‘लहानाचे मोठे होणे’ या प्रक्रियेत निसर्गाचा वाटा किती हे उमगण्याचा तो मंतरलेला काळ होता. आम्हाला पाचवीत, सहावीत आणि सातवीत मराठी विषयासाठी आचार्य अत्रे यांनी संपादित केलेली ‘सुभाषवाचन माला’ होती. ‘पक्ष्यांत परमेश्‍वर आहे’, ‘प्राण्यांत परमेश्‍वर आहे’ आणि ‘निसर्गात परमेश्‍वर आहे’ असे ओळीने तिन्ही वर्षांसाठी पाठ होते. आता असे वाटते की तुकारामांच्या सुप्रसिद्ध अभंगांचे विनोबाजींनी केलेले हे निरूपण तर नव्हे ना? इतके आशयगर्भ लेखन इतक्या सोप्या, सुलभ शैलीत तेच करू शकतात किंवा साने गुरुजी किंवा आचार्य अत्रे!

त्याच काळात शाळेत असताना सानेगुरुजींनी सुधास लिहिलेली ‘सुंदर पत्रे’ हातात पडली. गोव्याच्या भूमीत सृष्टीचा लावण्यमहोत्सव संवेदनक्षम वयात अनुभवला होता. पण ‘प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट’ ही अनुभूती साने गुुरुजींच्या भावकोमल शब्दांतूनच आली. दुर्गाबाई भागवत यांचा ‘पुष्पमंडित भाद्रपद’ हा ललितनिबंध आमच्या पाठ्यपुस्तकात होता. भाद्रपदाचे रूपवैभव अनुभवल्यानंतर काही वर्षांनी त्यांचे ‘ऋतुचक्र’ हाती पडले, आणि हळूहळू दुर्गाबाईंच्या डोळ्यांनी निसर्गाकडे पाहता आले पाहिजे असे वाटायला लागले. मंत्रमुग्ध होऊन वाचलेला मजकूर पुन्हा एकदा वाचावा, हे क्षणतरंग मनात मुरवावेत अशी प्रेरणा होत गेली. तेव्हापासून दुर्गाबाईंचे ‘ऋतुचक्र’ आणि त्यांची काव्यात्मकतेने ओथंबलेली शब्दकळा माझ्या मर्मबंधातली ठेव होऊन बसली. आयुष्याच्या पुढच्या प्रवासात शरदिनी डहाणूकर यांच्या ‘वृक्षगान’नेही असा अपूर्व आनंद दिला.

१९६५ मध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी मडगावला आलो. येथील ग्रंथालयात मधु मंगेश कर्णिक यांची दोन पुस्तके वाचली. एक होते ‘लागेबंधे.’ त्यात त्यांनी आप्तजनांविषयी जिव्हाळ्याने लिहिले होते. दुसरे पुस्तक होते ‘सोबत.’ या पुस्तकात पहिल्या भागात त्यांनी आंबा, चिंच, शेवगा, पिंपळ, वड, औदुंबर, बकुळ, फणस आणि केळ या कोकणप्रदेशातील झाडांविषयी, आप्तांविषयी जितक्या जिव्हाळ्याने लिहावे तसेच लिहिले होते. त्यांनी या वृक्षविशेषांतून आपले भावविश्‍व उभे केले होते. ते मला अत्यंत भावले. या चित्रणाला त्यांनी मानवी संवेदनात्मकतेचे रंग बहाल केले होते. हे त्यांचे अनोखे गुणवैशिष्ट्य होते. दुसर्‍या भागात त्यांनी मोती कुत्रा, कावळे, चिमण्या आणि गाढव यांचे वर्णन केले होते. तिसर्‍या भागात पाऊस, पाऊलवाट, झोपाळा आणि आकाश यांचे चित्रण केले होते. या सार्‍या लेखनातून निसर्गसृष्टी, पशु-पक्षिसृष्टी, पर्यावरण आणि आपले गृहजीवन यांमुळे आपल्याला ‘माणूस’ बनविले आहे असे अंतःसूूूूर त्यांनी या पुस्तकातून अधोरेखित केले आहे असे जाणवले.

निसर्ग आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळी भरून देत असतो. ते सारे स्वीकारताना आपलीच ओंजळ अपुरी पडते. निसर्ग जसा शुभंकर, सृजनशील आहे तसाच तो प्रलयंकारीदेखील आहे. जसा निसर्ग तसाच मानवही. सुष्ट-दुष्ट प्रवृत्ती निसर्गाकडूनच माणसाला लाभलेल्या आहेत. हे जैविक नाते अभेद्य आहे. त्यामुळे निसर्गाशी समतानता साधून सुष्ट प्रवृत्तींचे उन्नयन करणे आणि दुष्ट प्रवृत्तींचे दमन करणे माणसाच्या अधीन आहे. माणूस संस्कृतिप्रिय असल्यामुळे त्याला ते शक्य आहे. निसर्गाच्या साथसंगतीमुळे माणसावर आपल्या संवेदनशीलतेचा विकास करता येतो. सौंदर्यदृष्टी जोपासता येते. चैतन्यशील बनता येते. परिपूर्णतेचा ध्यास घेता येतो.

माणसानं निसर्गाकडून काय काय घ्यावं?
त्यानं झाडासारखं वर्धिष्णू व्हावं… फळांनी ओथंबून आल्यावर विनयशीलतेनं वाकावं. जो आसर्‍याला येईल त्याला सावली द्यावी… दुर्बलांना आधार द्यावा… एक झाड दुसर्‍या झाडाकडे पाहून डुलतं, तसंच दुसर्‍याचे यश पाहून आनंदित व्हावं… हिरवेगारपणा टिकवून ठेवावा… कधी चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात न्हाऊन निघावं… झाडाला पाहता पाहता आपणच एक दिवस झाड होऊन जावं!