‘वीस कलमी’ कार्यक्रमांतर्गत बांधलेली घरे नियमित करणार

0
9

राज्यातील वीस कलमी कार्यक्रमांतर्गत बांधण्यात आलेली घरे नियमित करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिली.

आमदार विजय सरदेसाई यांच्या वीस कलमी कार्यक्रमातील घरे नियमित करण्याबाबतच्या खासगी ठरावाला उत्तर देताना ते बोलत होते. राज्यात वीस कलमी कार्यक्रमांतर्गत वितरित केलेल्या भूखंडावरील घरे नियमित करावी, असा खासगी ठराव विजय सरदेसाई यांनी मांडला होता.

राज्यातील वीस कलमी कार्यक्रमांतर्गत सरकारी, कोमुनिदाद जागेत बांधण्यात आलेली घरे नियमित करण्यासाठी गोवा अनियमित बांधकाम नियमितीकरण कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे. राज्य सरकारने खासगी जमिनीतील बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर वीस कलमी कार्यक्रमातील घरे नियमिती केली जाणार आहेत. वीस कलमी कार्यक्रमांतर्गत कायदेशीर भूखंड देण्यात आले आहेत. त्या भूखंडावर बांधलेली घरे नियमित केली जाणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जमीन नसलेल्या गरीब कुटुंबाना केंद्र सरकारच्या वीस कलमी कार्यक्रमाखाली 100 चौरस मीटरचा भूखंड देण्यात आले आहेत. वीस कलमी कार्यक्रमाखाली दिलेली जमीन ही वर्ग 2 ची असल्याने त्या भूखंडावरील घरे नियमित करण्यात अडचण येते, असे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले.