कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याची मुलगी विद्या राणी या लोकसभा निवडणूूक लढवणार आहे. त्या तमिळनाडूतील कृष्णगिरी या जागेवरून निवडणूक लढवणार आहेत. त्यांना नाम तमिझार काची (एनटीसी) या पक्षाने उमेदवारी दिली आहे. विद्या राणी यांनी 2020 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना तमिळनाडू भाजपच्या युवा शाखेचे अध्यक्षपद देण्यात आले होते; मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपला रामराम ठोकत एनटीसी पक्षात प्रवेश केला होता. याच पक्षाकडून आता त्या लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. एनटीसी पक्षाने तमिळनाडूत एकूण 40 उमेदवारांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या 40 उमेदवारांत निम्म्या उमेदवार महिला आहेत. यात विद्या राणी यांचाही समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विद्या राणी या राजकारणात सक्रिय आहेत. कृष्णागिरी या भागात त्या एक शाळा चालवतात. बंगळुरू शहरात त्यांनी पाच वर्षे वकिलीचे शिक्षण घेतलेले आहे.