वीज बिलातील एफपीपीसीए प्रश्‍नावर मुख्य अभियंत्यांना कॉंग्रेसचा घेराव

0
159

अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सचिव गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली काल कॉंग्रेस पदाधिकार्‍यांनी वीज खात्याचे मुख्य अभियंता रेड्डी यांना त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन घेराव घातला व वीज बिलातील एफपीपीसीए दर रद्द करण्याची त्यांच्याकडे मागणी केली. मात्र, वीज बिलातील एफपीपीसीए दर रद्द करण्याचा अधिकार आपणाला नसून तो केवळ सरकारला आहे व आपण मागणी सरकारच्या कानावर घालतो, असे आश्‍वासन रेड्डी यांनी दिल्याचे चोडणकर यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. सहा दिवसांच्या आत सरकार दरबारी आमची मागणी मांडण्याचे आश्‍वासन रेड्डी यांनी दिले आहे, असे चोडणकर यांनी सांगितले.
वीज बिलातील एफपीपीसीएमुळे लोकांना भरमसाठ वीज बिले आल्याने लोकांत नाराजी पसरल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली वीज खात्याचे मुख्य अभियंते रेड्डी यांना घेराव घातला होता. कॉंग्रेस पदाधिकार्‍यांनी रेड्डी यांना सुमारे दीड तास घेराव घालून एफपीपीसीएच्या प्रश्‍नावरून त्यांना धारेवर धरले. एफपीपीसीएमुळे वीज बिलात एक-तृतीयांश एवढी वाढ झाली असल्याचे यावेळी चोडणकर यांनी रेड्डी यांच्या नजरेत आणून दिले.
एफपीपीसीए वीज बिलात एकदाच लागू करण्यात येणार असल्याचे वीज मंत्री सांगतात. तर तुम्ही तो तीन महिन्यांनी एकदा लागू करण्यात येणार असल्याचे सांगता हे कसे काय, असा प्रश्‍नही आम्ही रेड्डी यांना केल्याचे चोडणकर यांनी पत्रकारांना सांगितले. एफपीपीसीए मागे न घेतल्यास आम्ही आंदोलन करू असा इशाराही रेड्डी यांना दिला असल्याचे चोडणकर यांनी यावेळी सांगितले. घेराव घालणार्‍यांमध्ये महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, सेवादल अध्यक्ष शंकर किर्लपाल, कॉंग्रेसचे उत्तर गोवा अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, सचिव ऍड. यतीश नाईक, गट अध्यक्ष विजय भिके, दक्षिण जिल्हा महिला अध्यक्ष सावित्री कवळेकर तसेच अविनाश तावारीस, जनार्दन भंडारी, सुबोध आमोणकर आदी मंडळी हजर होती, असे चोडणकर यांनी सांगितले.