>> वीजमंत्री; आज श्वेतपत्रिका जारी करणार
राज्यात आगामी तीन महिन्यांसाठीची वीज दरवाढ नाममात्र असून कमीत कमी युनिटमागे केवळ ३ पैसे एवढी वाढ झालेली आहे. विरोधकांकडून वीज दरवाढीवरून नाहक टीका केली जात आहे. राज्यातील मागील सहा तिमाहीतील (अठरा महिने) वीज बिलाच्या दरासंबंधी श्वेतपत्रिका आज बुधवारी जारी केली जाणार आहे, अशी माहिती वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी काल केली.
संयुक्त वीज नियमन आयोगाकडून कोळसा व इतर इंधनाच्या दरानुसार वीज बिलाचा दर निश्चित केला जातो. त्यामुळे दर तीन महिन्यांनी वीज बिलाच्या दरात वाढ किंवा कपात होत असते. वीज खात्याकडून वीज बिल दर प्रसिद्ध केला जातो. परंतु, प्रत्यक्षात वीज बिल वाढ ही युनिटमागे ३ पैसे, ८ पैसे, १५ पैसे एवढी आहे. राज्यात २४ तास वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर वीज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. राज्य सरकारकडून ५ रुपयांपेक्षा जास्त दराने विजेची खरेदी करून दीड ते दोन रुपये दराने ग्राहकांना दिली जात आहे, असेही काब्राल यांनी सांगितले.
दिल्ली सरकारकडून २०० युनिट वीज मोफत दिली जाते. परंतु, तेथील विजेचे दर जास्त आहेत. याकडे कुणीही लक्ष देत नाही. दिल्लीसारखा वीज दर आकारून गोव्यात २५० युनिट वीज मोफत देऊ शकतो. यामुळे वीज दरात वाढ झाल्यास आमच्या नावाने ओरड करता कमा नये, असेही मंत्री काब्राल यांनी सांगितले.
वीजमंत्री काब्राल यांनी वीज बिल आकारणीमध्ये स्लॅब पद्धत रद्द करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. वीज बिल आकारणीतील स्लॅब रद्द पद्धतीची अंमलबजावणी येत्या एप्रिल २०२० पासून केली जाणार आहे. गरीब व्यक्तीला स्लॅब पद्धत रद्दमुळे कोणताही फटका बसणार नाही, याचा काळजी घेण्यात आलेली आहे. या स्लॅब पद्धत रद्दमुळे सुमारे ३५ कोटींचा महसूल मिळणार आहे. राज्य सरकारकडून वीज खात्याला वार्षिक ३५० कोटी रुपये उपलब्ध केले जातात. आगामी वर्षासाठी ३२५ कोटीची तरतूद केलेली आहे, पणजी, मडगाव येथील भूमिगत केबल योजनेचा अभ्यास केल्यानंतर राज्यातील इतर भागात भूमिगत केबल घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असेही काब्राल यांनी सांगितले.