राज्यातील वीज खात्याच्या कारभारात आधुनिकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असले तरी सध्याच्या कारभारात सुधारणा होत नसल्याचे केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. ग्राहकांच्या तक्रारी प्रलंबित ठेवण्याच्या बाबतीत देशात गोवा चक्क १५ व्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, पंजाब आणि त्रिपुरा या पाच राज्यांचे ग्राहकांच्या तक्रारी प्रलंबित ठेवण्याचे प्रमाण शून्य आहे.
केंद्र सरकारच्या ऊर्जा ऍपवर देशातील सर्व राज्यांची वीज प्रलंबित तक्रारी, ग्राहकांचा बिल भरणा, नवीन वीजजोडण्या, वीज वाया किंवा चोरी आदींबाबत दर महिन्याला माहिती उपलब्ध करण्यात येते. नोव्हेंबर महिन्यातील माहितीनुसार ग्राहकांच्या तक्रारी प्रलंबित ठेवण्याची गोवा राज्याची टक्केवारी ५७.९ टक्के एवढी आहे. तर जुलै २०१७ मध्ये ग्राहकांच्या तक्रारी प्रलंबित ठेवण्याबाबत गोवा १३ व्या क्रमांकावर होेता. त्यावेळीची टक्केवारी ५४.१ एवढी होती.
नवीन जोडण्या : २२ वे स्थान
नवीन वीज जोडण्या देण्याबाबत गोवा राज्य २२ व्या स्थानावर आहे. ८०.३ टक्के वीज कनेक्शनची प्रकरणे प्रलंबित आहेत. जुलै २०१७ मध्ये नवीन वीज कनेक्शन देण्याबाबत गोवा २४ व्या स्थानावर होता. त्यावेळी कनेक्शन प्रलंबित ठेवण्याची टक्केवारी ८१.४ टक्के एवढी होती. तर महाराष्ट्र राज्याची प्रलंबित वीज कनेक्शनची टक्केवारी ०.६ टक्के एवढी आहे.
ई-पेमेंट २२ वा क्रमांक
राज्य सरकारकडून ई पेमेंटला प्रोत्साहन देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंतु, वीज ग्राहकांना ई पेमेंटकडे वळविण्यासाठी यश प्राप्त झाले नाहीत. देशात ग्राहकांच्या ई पेमेंटच्याबाबतीत गोवा २२ व्या स्थानावर आहे. केवळ ४ टक्के वीज ग्राहक ई पेमेंटद्वारे वीज बिलांचा भरणा करीत आहे. जुलै महिन्यात ग्राहक ई पेमेंटची टक्केवारी ३.२ एवढी होती. ग्राहकांच्या ई पेमेंटच्या बाबतीत देशात तेलंगणा ३३ टक्क्यांसह प्रथम क्रमांकावर आहे.
वीज चोरीत ९वे स्थान
वीज चोरी किंवा वीज वाया होण्याच्या बाबतीत देशपातळीवर गोवा ९ व्या स्थानावर आहे. २७.३ टक्के वीज वाया किंवा चोरी होत आहे, अशी माहिती ऍपवर देण्यात आली आहे. जुलै २०१७ या महिन्यात वीज चोरी किंवा वायाबाबतीत गोवा ७ व्या स्थानावर होता. त्यावेळचे प्रमाण १५.८ टक्के एवढे होते. देशात आंध्रप्रदेशमध्ये सर्वांत कमी ८.७ टक्के वीज चोरी किंवा वाया जात आहे. महिना सरासरी ४.५३ तास एवढा वेळ वीज खंडित होण्याचे प्रकार घडतात. त्यात देशात गोवा ६ व्या स्थानावर आहे. महिन्यातून ८.३ वेळा वीजपुरवठा खंडित होतो. त्यात गोवा ८ व्या स्थानावर आहे. ऍपवर उपलब्ध होणारी माहिती केवळ ११ केव्ही फिडर्सची असते.