वीज घोटाळा : मावीन गुदिन्हो सुनावणीवेळी कोर्टात उपस्थित

0
163

राज्यातील २००१ मधील कथित वीज घोटाळा प्रकरणी विद्यमान पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांनी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात काल उपस्थिती लावली. ऍड. आयरिश रॉड्रिग्स यांनी या खटल्यासर्ंद्भात दाखल केलेल्या एका अर्जावर मंत्री गुदिन्हो यांच्या वकिलांनी बाजू मांडण्यासाठी वेळ मागून घेतल्याने पुढील सुनावणी २८ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. गुदिन्हो यांच्या वकिलांनी प्रतिउत्तराची प्रत दोन दिवस अगोदर ऍड. रॉड्रिग्स यांना द्यावी, अशी सूचना न्यायालयाने केली आहे.

राज्यातील कथित वीज घोटाळा प्रकरण बरेच गाजले होते. विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २००१ मध्ये वीज घोटाळा प्रकरणाचा भांडाफोड केला होता. आता, मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात गुदिन्हो पंचायत खात्याचे मंत्री म्हणून कार्यरत आहेत.

या कथित वीज घोटाळ्याच्या पहिल्या सुनावणीला मंत्री गुदिन्हो अनुपस्थित राहिले होते. न्यायालयाच्या निर्देशानुसार मंत्री गुदिन्हो कालच्या सुनावणीला उपस्थित राहिले. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली तत्कालीन वीजमंत्री गुदिन्हो, तत्कालीन वीज मुख्य अभियंता व चार जणांच्या विरोधात तक्रार करण्यात आलेली आहे. या खटल्यासाठी खास सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, अशी मागणी ऍड. रॉड्रिग्स यांनी केली आहे.

आपला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्‍वास असून या प्रकरणातून सहीसलामत बाहेर येईन, अशी प्रतिक्रिया मंत्री गुदिन्हो यांनी व्यक्त केली.