वीज खात्याकडून शुल्क वाढीची अधिसूचना जारी

0
125

>> वीज ग्राहकांना लवकरच बसणार दरवाढीची झळ

वीज खात्याने जानेवारी ते मार्च २०२० या तीन महिन्यांसाठीचे नवीन वीज बिल शुल्क दर अधिसूचित केले आहे. या नवीन वीज बिल शुल्क दरांमुळे ग्राहकांना वीज दरवाढीला तोंड द्यावे लागणार आहे.
वीज खात्याचे मुख्य वीज अभियंता रघुवीर केणी यांनी नवीन वीज बिल शुल्कासंबंधीची सूचना १० फेब्रुवारी २०२० च्या सरकारी पत्रकात जारी केली आहे. राज्यात विजेची निर्मिती होत नसल्याने परराज्यातून वीज खरेदी करावी लागत आहे.

संयुक्त वीज नियमन आयोगाकडून इंधन व वीज खरेदी खर्चानुसार वीज बिलासाठी प्रति युनिट रक्कम निश्‍चित केली जाते. त्यामुळे दर तीन महिन्यांनी राज्यातील वीज दरात नेहमी चढ उतार होत असतो. मागील ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या तीन महिन्यांसाठी वाढीव वीज बिल शुल्क दर जारी केले होते. आता, नव्याने जारी केलेल्या सूचनेमध्ये वीज दरात आणखी वाढ करण्यात आली आहे.

नवीन फॉर्म्युल्यानुसार घरगुती विजेसाठी पहिल्या १०० युनिटना २५.५२ रु. प्रति युनिट असा दर आकारला जाणार आहे. मागील तीन महिन्यांसाठी हा दर १८.३० पैसे प्रति युनिट असा होता. १०१ ते २०० युनिटसाठी २६.२० पैसे प्रति युनिट, २०१ ते ३०० युनिटसाठी ३३.४१ पैसे प्रति युनिट, ३०१ ते ४०० युनिटसाठी ४१.६५ पैसे प्रति युनिट आणि ४०० युनिटवरील विजेसाठी ४६.२३ पैसे प्रति युनिट असा दर आकारला जाणार आहे.

व्यावसायिक विजेसाठी पहिल्या १०० युनिटसाठी ४७.३० पैसे प्रति युनिट असा दर आकारला जाणार आहे. मागील तीन महिन्यांसाठी हा दर १८.४२ पैसे प्रति युनिट असा होता. १०१ ते २०० युनिटसाठी ४७.३० पैसे प्रति युनिट, २०१ ते ४०० युनिटसाठी ४७.३० पैसे प्रति युनिट आणि ४०० युनिटपेक्षा जास्त विजेसाठी ४७.३० पैसे प्रति युनिट असा दर आकारला जाणार आहे.

उद्योगांसाठीही दरवाढ
उद्योग कंपन्यांसाठी पहिल्या ५०० युनिटसाठी ४७.३० पैसे प्रति युनिट असा दर आकारला जाणार आहे. मागील तीन महिन्यांसाठी १९.५१ पैसे प्रति युनिट असा दर होता. ५०० पेक्षा जास्त वीज वापरासाठी ४७.३० पैसे प्रति युनिट असा दर आकारला जाणार आहे. हॉटेल उद्योगासाठी ४७.३० पैसे प्रति युनिट असा दर आकारला जाणार आहे. मागील तीन महिन्यासाठी हा दर २०.८८ पैसे प्रति युनिट असा होता.