>> सुनावणीवेळी गोवा खंडपीठाची केबल ऑपरेटर्सना सूचना
वीज खात्याचे खांब वापराच्या शुल्क थकबाकीपैकी 20 टक्के रक्कम जमा करण्याची सूचना काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्यातील केबल ऑपरेटरांना केली.
वीज खात्याने राज्यातील केबल ऑपरेटरांना वीज खांब वापराबाबत शुल्क थकबाकीची नोटीस जारी केली आहे. या नोटिसीच्या विरोधात अखिल गोवा केबल टीव्ही नेटवर्किंग अँड सर्व्हिस प्रोव्हायडर्स असोसिएशनने गोवा खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर काल सुनावणी घेण्यात आली. खंडपीठाने थकबाकी निश्चित करण्याचे निर्देश दिले असून, 20 टक्के थकबाकी जमा करण्याची सूचना केली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली.
वीज खात्याचे खांब केबल घालण्यासाठी वापरण्यासाठी मान्यता घेण्यात आलेली नाही. 2021 पासून वीज खात्याचे खांब केबल घालण्यासाठी वापरले जात आहेत. वीज खात्याचा एक खांब वापरासाठी 300 रूपये शुल्क निश्चित केलेले आहे. वीज खात्याने केबल ऑपरेटरांना प्रलंबित शुल्क वसुलीसाठी नोटीस जारी केल्या आहेत, असे ॲड. पांगम यांनी सांगितले.
वीज खात्याने शुल्क वसुलीसाठी नोटीस जारी केल्यानंतर काही जणांनी परवानगी घेण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. गोवा खंडपीठाने अखिल गोवा केबल टीव्ही नेटवर्किंग अँड सर्व्हिस प्रोव्हायडर्स असोसिएशनला त्यांचे सदस्य आणि त्यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या वीज खांबांची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारकडून असोसिएशनचे सदस्य, त्यांच्याकडून वापरण्यात येणारे खांब, प्रलंबित थकबाकी याची सविस्तर माहिती सादर केली जाणार आहे, असे ॲड. पांगम यांनी सांगितले.