वीजविषयक पायाभूत सुविधांसाठी ७१० कोटींचा निधी

0
10

>> केंद्र सरकारकडून गोव्यातील कामांसाठी निधी मंजूर; वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती

केंद्र सरकारने राज्यातील वीजविषयक पायाभूत सुविधा आणि स्मार्ट मीटरिंगसाठी ७१० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. केंद्र सरकारने वीजपुरवठ्याशी संबंधित विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी २४३.४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच, स्मार्ट मीटरिंग प्रकल्पासाठी ४६७ कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे.

केंद्र सरकारकडे राज्याने विविध प्रकल्पांसाठी १६,००० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. केंद्रीय वीजमंत्र्यांनी नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत नियोजन आयोगाच्या दुसर्‍या बैठकीनंतर आणखी अनेक प्रकल्पांना मंजुरी देण्याचे आश्वासन दिले आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले.
पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे, जंगले, कृषी तळ, समुद्र किनारा इत्यादी ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचा प्रकल्प पुढील महिन्यापर्यंत केंद्राकडे सादर केला जाईल. संपूर्ण गोव्यात भूमिगत वीजवाहिन्यांसाठी सुमारे १५,००० कोटी रुपये आवश्यक आहेत, असेही ढवळीकर यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या वीज विभागाची महसूल परिस्थिती चांगली आहे. महसुलात जवळपास चाळीस टक्के वाढ झाली आहे, असा दावा ढवळीकर यांनी केला.

सर्व शैक्षणिक संस्थांवर ‘गेडा’च्या माध्यमातून सौर ऊर्जा युनिट बसविण्याचा प्रस्ताव आहे. पहिल्या टप्प्यात उत्तर आणि दक्षिण गोव्यातील काही संस्थांमध्ये प्रायोगिक तत्त्वांवर प्रकल्प उभारले जातील. इलेक्ट्रिक वाहन खरेदी योजनेअंतर्गत अनुदानासाठी पात्र असलेल्या सुमारे २४९ लाभार्थ्यांना पुढील २ आठवड्यांत देय असलेले अनुदान दिले जाईल. या कामासाठी वीज विभागाला ५.५ कोटी रुपये मिळाले आहेत. राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन अनुदान योजना तात्पुरती बंद ठेवली आहे. येत्या डिसेंबरपर्यंत त्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

खाणींमध्ये साठलेल्या पाण्यापासून जलविद्युत निर्मितीची व्यवहार्यता तपासण्यासाठी आयआयटी आधारित स्वयंसेवी संस्था गोव्यात येण्याची शक्यता आहे. ज्या खाणकाम क्षेत्रात झाडे नाहीत, अशा ठिकाणी सौर पॅनल बसवण्याचा विचारही विभाग करत आहे. ‘गेडा’मार्फत चालवल्या जाणार्‍या बायोमास ब्रिकेटिंग प्लांटची क्षमता २० टनांवरून ४० टन प्रतिदिन करण्यात येणार आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले.

नरकासुर प्रतिमा, स्पर्धांना देणग्या देणे टाळा

नागरिकांनी नरकासुराचा नायनाट करावा, असे आवाहन मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले. नागरिकांनी नरकासुराचे अवडंबर माजवू नये, असे आपले प्रामाणिक मत आहे. आम्हाला नरकासुर नको आहे, त्यातून सकारात्मक काहीही निष्पन्न होत नाही. त्याऐवजी दिवे लावा, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच राजकारण्यांनी नरकासुर प्रतिमा निर्मितीसाठी आणि स्पर्धांसाठी देणण्या देऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.