विस्तारवादाचे युग संपले ः मोदी

0
149

>> लेह दौर्‍यात पंतप्रधानांचा चीनला इशारा

जगाच्या विकासासाठी शांतता आवश्यक आहे. गेल्या काही काळात विस्तारवादानेच मानवतेचा विनाश आरंभला आहे. ज्यांना विस्तारवाद हवा आहे त्यांनी कायम जागतिक शांतीपुढे धोका निर्माण केला. अशी विस्तारवादी भूमिका घेणार्‍या शक्ती पूर्णपणे संपल्या किंवा मागे हटल्या. संपूर्ण जग आज विस्तावादाविरोधात एकवटले असून भारताने कायम मानवतेच्या सुरक्षेसाठी काम केले आहे.

संपूर्ण जगाने आपल्या जवानांचा पराक्रम पाहिला आहे. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला इशारा दिला. काल शुक्रवारी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह येथील निमू भागाचा दौरा केला आणि तिथल्या सैनिकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. या भेटीमुळे सीमेवरील भारतीय जवानांचे मनोधैर्य वाढले आहे.

पंतप्रधानांनी जवानांशी संवाद साधताना, तुमचे शौर्य, भारतमातेच्या रक्षणासाठी तुम्ही करत असलेले समर्पण हे अतुलनीय आहे. तुम्ही ज्या कठिण काळात आणि ज्या उंच ठिकाणी भारतमातेची ढाल बनून उभे आहात त्याची तुलना जगातल्या कशाचीच होऊ शकत नाही. संपूर्ण देशाला तुमच्या शौर्याबाबत प्रचंड अभिमान आहे. तुम्ही इथे आहात त्यामुळे तुमच्या बाबत प्रत्येक भारतीयाच्या मनात एक अढळ विश्वास आहे असे मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी गलवान खोर्‍यात हुतात्मा झालेल्या २० जवानांना आदरांजली वाहिली. दरम्यान, यावेळी पंतप्रधानांनी जखमी झालेल्या जवानांचीही भेट घेतली.