विषवल्ली वेळीच रोखा

0
23

धार्मिक सौहार्द आणि सलोखा ही आपल्या गोव्याची आजवरची ओळख आहे. येथील शांततामय वातावरणामुळेच जगभरातील पर्यटक येथे येत असतात. जीवनातील ताणतणावांतून येथे विसावा घेत असतात. काळ बदलत चालला आहे, तसा गोवाही बदलत चालला आहे हे खरे, परंतु या भूमीची मूळ मूल्येच उखडून टाकण्याचा प्रयत्न जर कोणी करीत असेल तर अशा प्रवृत्तीवर वेळीच अंकुश आणणे गरजेचे आहे. वास्को शहरामध्ये रामनवमी मिरवणुकीच्या निमित्ताने तेथे जो काही हिंदू – मुसलमान तणाव निर्माण झाला, त्यामागच्या कर्त्या करवित्यांचा शोध वेळीच घेतला गेला नाही, तर धार्मिक विद्वेष पसरवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेऊ पाहणार्‍यांनी लावलेली ही विषवल्ली फोफावत जाण्याची भीती आहे. तसे झाले तर ती गोव्याची आजवरची ओळख पुसून तर टाकीलच, पण येथील शांतता आणि धार्मिक सलोख्याला कायमचा सुरूंग लावून असुरक्षिततेची तलवार समस्त जनतेच्या माथी कायमची टांगती ठेवील.
वास्कोत रामनवमी मिरवणुकीच्या वेळी दोन गटांमध्ये विवाद झाला आणि त्यातून धार्मिक तणाव निर्माण झाला. तेथे नेमके काय घडले ते स्पष्ट नाही. रामनवमी मिरवणुकीवर दगडफेक झाली असेल तर ती नेमकी कोठून झाली, कोणी केली व त्यामागचे इरादे काय होते याचा कसोशीने शोध घेणे जेवढे जरूरी आहे, तेवढेच खरोखर दगडफेक झाली की तसा कांगावा हेतुपुरस्सर करण्यात आला हेही तपासले जाण्याची आवश्यकता आहे. काही समाजकंटकांनी कुरापत काढली असेल असे मानले तरी देखील वास्कोतील समस्त मुसलमान समाजाला त्यासाठी आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणेही योग्य ठरणार नाही. कोणत्याही समाजामध्ये अतिरेकी प्रवृत्ती नेहमीच असतात आणि त्या मूठभरच असतात. त्यांच्या चिथावणीला बळी पडून आणि त्यांची राजकीय ईप्सिते साध्य करण्यासाठी इतरांनी अफवांना बळी पडून आपला विवेक गमावून बसणे समर्थनीय ठरणार नाही. आजकाल सोशल मीडिया हे दुधारी हत्यार बनले आहे. त्याचा जसा चांगल्या कामासाठी वापर करता येऊ शकतो, त्याहून कैक पटींनी अफवा पसरविण्यासाठी, अविश्वास निर्माण करण्यासाठीही केला जाऊ शकतो. त्यामुळे अशा घटनांचा वापर चिथावणीसाठी होणार नाही हे प्रशासनाने पाहिले पाहिजे.
वास्कोतील घटनेच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात. खरे तर रामनवमी हा रामजन्माचा उत्सव आहे. रामजन्म हा परंपरेनुसार रामाच्या मंदिरामध्ये विधिपूर्वक साजरा केला जातो. त्याचे निमित्त करून गावातून मिरवणूक काढण्याची प्रथा गोव्यात तरी यापूर्वी कधीही नव्हती व नाही. मग ही मिरवणूक हा नेमका काय प्रकार होता? अशा मिरवणुकीला पोलिसांनी परवानगी दिली होती, तर तिला सुरक्षा पुरविणे ही देखील पोलिसांची जबाबदारी होती. ज्या अर्थी तणाव निर्माण झाला, त्या अर्थी आपल्या कर्तव्यात पोलिसांकडून कुचराई झाली असाच अर्थ निघतो. एखादी मिरवणूक काढली जाते, तेव्हा तिचा मार्ग आखून दिलेला असतो व त्याच मार्गाने ती मिरवणूक जाणे अपेक्षित असते. या मार्गामध्ये कोठे काही धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतो का याची चाचपणी करणे ही तर अशी परवानगी देण्यापूर्वी पाहावयाची अगदी प्राथमिक गोष्ट आहे. तशी काही शक्यता असेल तर शक्यतो मार्ग बदलणे किंवा अगदीच निरुपाय असेल तर गडबड होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी वाढीव बंदोबस्त ठेवणे गरजेचे असते. ही मिरवणूक दिलेल्या मार्गाने निघाली होती का? मग ती इस्लामनगर नावाने ओळखल्या जाणार्‍या भागात कशी पोहोचली? अशा अनेक गोष्टींच्या मुळाशी आता जावे लागेल.
मिरवणुकीत गोंधळ उडाल्यानंतर दुसर्‍या गटाने मशिदीत घुसण्याचा व जाब विचारण्याचा प्रयत्न केला. कायदा हातात घेऊन शांतताभंग करण्याचा हक्क कोणालाही दिलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी हा प्रकार रोखणे तितकेच गरजेचे होते, त्यातही कुचराई झालेली दिसते. आता जे झाले ते तर घडून गेले, परंतु या निमित्ताने डोके वर काढण्याची संधी दोन्ही समाजांतील कडव्या विखारी शक्तींना मिळणार नाही हे पाहिले जावे. त्यासाठी दोन्ही धर्मांच्या सुबुद्ध नागरिकांनी एकत्र यावे, पोलिसांनी एखादी शांतता समिती स्थापन करून किमान तापलेले वातावरण निवळण्याचा प्रयत्न करावा. काही वर्षांपूर्वी कुडचड्यात धार्मिक दंगल उसळली होती, त्यानंतर प्रथमच असा धार्मिक तणाव राज्यात निर्माण झालेला आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी व झाल्या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. धार्मिक सलोखा पुनर्प्रस्थापित करण्याचा प्रयत्नही करावा. अन्यथा ह्या काट्याचा नायटा व्हायला वेळ लागणार नाही.