विषम भोजन- रोगांना निमंत्रण

0
933

– डॉ. मनाली पवार

आहारापासूनच मनुष्याचे शरीर तयार होते. माणे रोगही मुळेच उत्पन्न होतात व म्हणून आहार अत्यंत काळजीपूर्वक सेवन करावा. प्राणधारण करणार्‍या प्रत्येक प्राणिमात्रांना आहार हा प्राणमय आहे. आहारावरच वर्ण, प्रसन्नता, जीवन, प्रतीक्षा, शरीर पुष्टी, उत्तम स्वर, सुख, संतोष, बल, मेधा अवलंबून असतात. शरीरामध्ये स्वास्थ्य टिकून राहील व पुढे उत्पन्न होणार्‍या रोगांचाही परिहार होईल अशा प्रकारचाच आहार सेवन करावा.
दोष, दूष्य, स्रोतोरोध, अग्निमांद्य व आम या पाच आव पदार्थांचा शरीरामध्ये कोणताही रोग उत्पन्न करण्यामध्ये महत्त्वाचा भाग असतो. या व्याधी घटकांमध्ये विकृती निर्माण झाली म्हणजे रोग उत्पन्न होतात आणि या व्याधी घटकांची प्रकृत व विकृत अवस्था ही योग्य वा अयोग्य आहार सेवनावरच अवलंबून असते. म्हणूनच प्रत्येक मनुष्याने दररोज हितकर आहाराचे योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे. तसेच आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवून जो मनुष्य योग्य आहार योग्य काळी सेवन करतो, त्याला कोणतेही रोग होत नाहीत.

विषम भोजन म्हणजे काय?
आयुर्वेद शास्त्रामध्ये सर्व रोगांचे मूळ हे विषम भोजन हेच आहे, असे सांगितलेले आहे. आजच्या काळात आपण विषम भोजन कशाला म्हणू? रोग उत्पन्न झाल्यावर पथ्य पालन करून औषधे खात बसणार की रोग उत्पन्नच होऊ नयेत म्हणून प्रयत्न करणार? आपल्याला मिळालेला हा मनुष्य जन्म आपण सुखी, आनंदी, व्याधी विरहीत जगू शकतो. फक्त थोडासा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे दिनचर्या, ऋतुचर्या पालन, आहार विधिविधानांचे पालन व योगांचे अवलंबन व्याधी उत्पन्न होण्यासाठी आपण जो आहार सेवन करतो, त्याचा मोठा वाटा आहे. आपण जे खातो त्यानेच रोग होतात, असे म्हटले तर कुणाला आवडणार नाही व पटणारही नाही. पण जर आपण अध्यशन, विषमाशन, समशन, अनशन, विरुद्धाशन असे पाच प्रकारचे विषमभोजन केले तर मात्र रोग नक्की उत्पन्न होतात. म्हणूनच हे विषमभोजन म्हणजे काय? अशा प्रकारचा आहार तर तुम्ही सेवन करत नाही ना? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

अध्यशन- विद्यादध्यशनं भुयो भुक्तस्योपरी भोजनम|
एकदा जेवल्यानंतर लगेच जेवणे याला अध्यशन म्हणतात. सामान्यतः एकदा भोजन केल्यावर पुन्हा ३-४ तास काहीही खाऊ नये. अगदी कुणी कितीही आग्रह केला तरी, किंवा पोट भरल्याची संवेदना आली, पण चविष्ट लागल्यामुळे अजीर्ण होईपर्यंत खात राहू नये.
पुढील लक्षणे उत्पन्न झाल्याशिवाय परत भोजन करू नये. उदा. मल, मूत्रांचे योग्य विसर्जन होणे, पूर्वी सेवन केेलेल्या अन्नाचा-द्रवाचा वास नसलेला ढेकर येणे, भूक लागण्याची मनस्वी जाणीव होणे, वाताचे अनुलोमन होऊन देहात हलकेपणा जाणवणे, मन प्रसन्न असून दोषांची गती स्वस्थानात होणे, हे नियम न पाळता अध्यशन केल्यास अजीर्ण, अलक्षक, विसूचीका, लठ्ठपणा सारखे भयंकर रोग त्रिदोषांचा प्रकोप होऊन उत्पन्न होतात.

२) विषमाशन- अकाले बहु च अल्पत्वं भुक्तं तू विषमाशनम्‌|
अयोग्य काळी अति अथवा अल्प भोजन घेणे म्हणजे विषमाशन होय. भूक लागलेली नसताना केवळ जेवणाची वेळ झालेली आहे म्हणून जेवणे. साधारण ५०% लोक जेवणाची वेळ झाली म्हणून किंवा ठरवलेल्या एका वेळेवर जेवतात. काही पुढे यानंतर योग्य वेळ येऊनही जेवण घेणे शक्य होणार नाही म्हणून जेवतात, तेव्हा भूकही लागलेली नसते व जेवणाची वेळही झालेली नसते. किंवा भूक लागूनही भोजन न करणे, २०% गृहिणी यामध्ये मोडतात. हे एवढे काम आटोपते नंतर जेवते म्हणून दुपारचे तीन-चार वाजवतात व रात्रीचे अकरा-बारा. या प्रकारात मोडणार्‍या गृहिणी नक्की जेवतात का? हा प्रश्‍न पडतो. अशा प्रकारच्या गृहिणींना नेहमी डोकेदुखी, अशक्तपणा, आम्लपित्त, अजीर्ण या प्रकारच्या व्याधी सतावत असतात.

३) समशन – मिश्रं पथ्यम्‌‌ अपथ्यम् च भुक्तं समशनं मतम्‌|
पथ्य व अपथ्यकर पदार्थांचे एकत्रित मिश्रण सेवन करणे यालाच समशन म्हणतात. याने त्रिदोष प्रकुपित होतात. उदाहरणार्थ दूध हे पथ्यकर आहार आहे व मद्य अपथ्यकर. मद्यपानाबरोबर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे म्हणजे समशन. पथ्यकर म्हणून कोमट पाणी पिणे व गरमी होते म्हणून फ्रिजमधील सॉफ्ट ड्रिंक किंवा आइस्क्रीम खाणे. मध कोमट पाण्यात किंवा कोमट दुधात सेवन करता येते. पण तेच गरम पाण्यात, गरम दुधात समशनाचा प्रकार होतो. सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात मध घालून प्याल्यास लठ्ठपणात उपयोगी पडतो, पण गरम पाण्यात घातल्यास अपायकारक ठरते. कारण मध गरम करून खाऊ नये.

४) अनशन- म्हणजे उपवास, लंघन किंवा अन्नाचे सेवन न करणे.
शरीर स्वास्थ्यासाठी कधीतरी लंघन करणे वेगळे व सतत भूक मारणे म्हणजे अनशन. काही महिला उपवास करतात. अगदी आठवड्यातून तीन-चार दिवस उपवास करतात. यामध्ये अगदी सकाळी उठल्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत उपाशी राहतात. भूक लागली तरी खात नाहीत. फक्त चहा पिणे. अगदी पाणीसुद्धा कमी पितात, या उपवासाला खरंच अर्थ असतो का? अशाने सतत दीर्घकाळ अनशन केल्यास शरीरातील धातूंचे पोषण न झाल्याने धातुक्षयजन्य वातप्रकोप होतो. याखेरीज बल, वर्ण, उपचय यांचा नाश होऊन मन, बुद्धी व इंद्रिये यांची कार्यक्षमता नष्ट होते. ओजाचा नाश झाल्याने आयुष्य देखील क्षीण होते व अनेक प्रकारचे वातव्याधी उत्पन्न होतात. सध्या तरुण मुली व स्त्रियां ‘डाएटिंग’च्या नावाखाली, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी या मार्गाचा किंवा अशाप्रकारे अन्न सेवनाचा मार्ग अवलंबताना दिसत आहेत.

५) विरुद्धाशन- देशविरुद्ध ज्या प्रकारचा देश असेल त्याच्या समान गुणांचा आहार देशविरुद्ध असतो. उदा. जांगल देश वातभूयिष्ठ असतो. तेथे रूक्ष-लघू-शीत गुणात्मक आहार देशाविरुद्ध आहे. क्षारयुक्त भूमीतील पाणी पिणे हे देखील देशविरुद्ध आहे.

-कालविरुद्ध- शीतकालात शीत-रूक्ष-लघू गुणात्मक आहार कालविरुद्ध. उदा. आइस्क्रीम हा असा पदार्थ आहे ज्याला आता कालाचे बंधन राहिलेले नाही. अगदी भर पावसात म्हणा किंवा कडाक्याच्या थंडीतसुद्धा आइस्क्रीम खाताना तुम्हाला लोक आढळतात. त्याचबरोबर अगदी अखेर रात्री जेवल्यावर वर परत आइस्क्रीम खाताना लोक दिसतात, हे चित्र म्हणजे कालविरुद्ध.

– अग्नीविरुद्ध- प्रकृतीप्रमाणे प्रत्येकाचा अग्नी किंवा आहार पचनाची क्षमता वेगळी असते. काहींची तीक्ष्ण, मंदाग्नी किंवा विषमाग्नि असतो. तिक्ष्णाग्नी असताना अति हलका, कमी आहार घेणे किंवा मंदाग्नी असता भरपूर व पचायला जड असा आहार हा अग्नीविरुद्ध आहार होय. अवेळी व अयोग्य मात्रेत जेवणे म्हणजे अग्नीविरुद्ध जेवणे.

– मात्राविरुद्ध- काही आहारद्रव्ये सममात्रात घेणे मात्राविरुद्ध असते. उदा. तूप व मध. तसेच योग्य मात्रेपेक्षा अधिक मात्रेत आहारीय द्रव्ये सेवन करणे हे मात्राविरुद्ध होय.

-सात्म्यविरुद्ध- जो आहार सात्म्य असतो त्याच्या विरोधी गुणांचा आहार सात्म्यविरुद्ध असतो. ज्या मनुष्याला मधुर, स्निग्ध असा आहार सात्म्य असतो त्याने एकदम उष्ण, तीक्ष्ण, तेलकट गुणात्मक किंवा मांसाशन, मद्यसेवन असा आहार घेतल्यास तो सात्म्यविरुद्ध ठरून व्याधीत्पन्नकर ठरेल.

– दोषविरुद्ध- प्रकृतीसम व प्रकुपित दोष समान गुणांचा आहार दोषविरुद्ध असतो. उदा. वात प्रकृतीच्या व वातप्रकोप झालेल्या मनुष्याने रूक्ष, लघू, शीत गुणांचा दोषविरुद्ध आहार घेऊ नये.

– संस्कारविरुद्ध- भाजणे, तेला-तुपात तळणे, वाफेवर शिजवणे इत्यादी विशिष्ट संस्कार शरीराला अहितकारक गुण निर्माण करीत असतील तर असे संस्कारविरुद्ध पदार्थ सेवन करू नयेत. उदा. दही गरम करून खाऊ नये.

-वीर्यविरुद्ध- उदा. दूध व मासे. कारण दूध शीतवीर्यात्मक तर मासे उष्णवीर्यात्मक आहेत. अशा आहार सेवन केल्यास कुष्ठरोग होतो.

-कोष्ठविरुद्ध- मृदुकोष्ठ असणार्‍या मनुष्याने खवा, मिठाई इत्यादी गुरु व विरेचन उत्पन्न करणारे कोष्ठविरुद्ध पदार्थ सेवन करू नयेत.

-अवस्था-क्रमविरुद्ध- वार्धक्यावस्थेत शक्यतो वातविरुद्ध आहार असावा. या अवस्थेत कृशत्व व वातप्रकोप करणारा अवस्थाविरुद्ध आहार करू नये.

– परिहारविरुद्ध- स्नेहनानंतर उष्ण जलसेवन करावे. त्याऐवजी शीतजल सेवन केल्यास परिहारविरुद्ध स्रोतोरोधजन्य रोग होतात. भोजनात मधुर पदार्थ खीर, गुलाबजामुन सारखे प्रथम खावे व आपण नेमके उलटे म्हणजे शेवटी खातो.

-पाकविरुद्ध- न शिजलेले, अर्धवट शिजलेले अन्न सेवन करणे हे पाकविरुद्ध आहे. तसेच मटण, चिकन सारखे पदार्थ अर्धवट शिजवणे किंवा तेलात तळून खाणे.

– संयोगविरुद्ध- आम्लरसाची फळे व दूध, दही व मासे, संयोगविरुद्ध विषमभोजन हे महत्त्वाचे रोगाचे कारण आहे. कारण फ्रुडसॅलड किंवा शेक हा पदार्थ खूप चवीने, अगदी उपवासाला सुद्धा वारंवार खाल्ला जातो. याने विविध त्वचारोग उत्पन्न होतात.

-हृदयविरुद्ध- मनाला अप्रिय असणारी गोष्ट सेवन करणे.

– संपदविरुद्ध- अतिपक्व, शिळे अन्न सेवन तसेच व्याधी झालेल्या प्राण्यांचे मांस खाणे.

-विधीविरुद्ध- अन्न गरम असताना, मनापासून बडबड न करताना सेवन करावे. असा नियम आहे. त्याचे पालन न करता अन्न सेवन करणे हे विधीविरुद्ध होय.