>> फिफा क्रमवारी
>> जर्मनीची १५व्या स्थानी घसरण
विश्वविजेत्या फ्रान्सने १७२६ गुणांसह काल गुरुवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत पहिले स्थान मिळविले आहे. पहिल्याच फेरीत आव्हान आटोपलेल्या माजी विजेत्या जर्मनीची १५व्या स्थानी घसरण झाली आहे.
१५ जुलै रोजी फ्रान्सने कोरियाचा ४-२ असा पराभव करून विश्वविजेतेपदाला गवसणी घातल्यानंतर फिफाने प्रथमच क्रमवारी जाहीर केली आहे. वादग्रस्त ठरलेली जुनी पद्धत बदलताना फिफाने नवीन पद्धतीचा वापर करून जाहीर केलेली ही पहिलीच क्रमवारी आहे.
बेल्जियमने (१७२३ गुण) ब्राझिलला (१६५७) तिसर्या स्थानी ढकलताना द्वितीय स्थानावर हक्क सांगितला आहे. बेल्जियमविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत झालेल्या पराभवाची किंमत ब्राझिलला मोजावी लागली आहे.
विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक दिलेल्या क्रोएशियाने (१६४३) विसाव्या स्थानावरून थेट चौथे स्थान प्राप्त केले आहे. ‘अंतिम ८’पर्यंत मजल मारलेल्या उरुग्वेने (१६२७) नऊ स्थानांची प्रगती करत पाचवे स्थान प्राप्त केले आहे. इंग्लंड (+ ६ स्थाने), पोर्तुगाल (-३), स्वित्झर्लंड (-२), स्पेन (+ १), डेन्मार्क (+ ३) यांनी अनुक्रमे सहावा ते दहावा क्रमांक मिळविला आहे. जर्मनी (-१४, १५वे स्थान), पोलंड (१०, १८वे स्थान), पेरू (-९, विसावे स्थान), कोस्टा रिका (-९, ३२वे स्थान) यांची अवनती झाली आहे.
आशियाई फुटबॉल महासंघाशी (एएफसी) संलग्नित देशांमध्ये भारताने एका स्थानाची प्रगती करताना ९६वे स्थान मिळविले आहे. इराण (+ ५, ३२वे स्थान), जपान (+ ६, ५५वे स्थान) यांना वर्ल्डकपमधील कामगिरीचा सकारात्मक लाभ झाला आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ ३६व्या स्थानावरून ४३व्या स्थानी फेकला गेला आहे.