विश्‍वजित राणेंना अपात्र ठरविण्याचा कॉंग्रेसचा निर्णय

0
78

विश्‍वासदर्शक ठरावाच्यावेळी कॉंग्रेस पक्षाचा आदेश धुडकावून गैरहजर राहण्याच्या विश्‍वजित राणे यांच्या कृतीची पक्षाने गंभीर दखल घेतली असून पक्षाच्या काल दुपारी झालेल्या तातडीच्या बैठकीत राणे यांच्या विरुद्ध पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्रतेचा अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला.

वरील अर्ज ताबडतोब हंगामी सभापतींना सादर करणार असल्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी सांगितले. पक्षाचे नेते प्रतापसिंह राणे यांनीही या विषयावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. विश्‍वजित यांनी वरील निर्णयाच्या बाबतीत वडील असलेले प्रतापसिंह राणे यांनाही अंधारात ठेवले. त्यामुळे सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला.
पक्षात संशयास्पदरित्या वावरणारे लोक पक्षातून गेलेले बरे. विश्‍वजित राणे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई म्हणून अपात्रतेचा अर्ज सभापतीकडे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांचे कॉंग्रेसला मार्गदर्शन असेल. ते पक्षाचे निष्ठावंत नेते असल्याचे पक्षाचे सरचिटणीस एम. के. शेख यांनी सांगितले.

..म्हणून राजीनामा ः विश्‍वजित
कॉंग्रेसला काळाची गरज ओळखता आली नाही. सरकार स्थापन करणे शक्य असतानाही राज्यपालांकडे दावा करण्यास विलंब लावला व त्यामुळे आपण वैङ्गल्यग्रस्त बनून पक्षाचा राजीनामा दिला, असे विश्‍वजित राणे यांनी सांगितले.
आपण भाजपच्या तिकीटावर पोटनिवडणूक लढविणार काय, या प्रश्‍नावर त्यांनी आपल्यासमोर अनेक पर्याय खुले असून कार्यकर्त्यांकडे चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून कॉंग्रेसला १७ जागा मिळवून नेता निवडता आला नाही. दिगंबर कामत यांची नेतेपदी निवड केली असती तर सरकार स्थापन झाले असते, असेही ते म्हणाले.

विश्‍वजित राणे यांच्यांकडून लोकशाहीची विटंबना ः खलप
विश्‍वजित राणे यांनी ज्या पद्धतीने विधानसभेत वर्तन केले त्यामुळे गोमंतकीय जनतेच्या हृदयसिंहासनावर स्थान असलेल्या राणे कुटुंबाला काळीमा ङ्गासल्याचे सांगून भारतीय लोकशाहीची विटंबना केल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते तथा माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप यांनी काल पत्रकार परिषदेत व्यक्त केली. राणे यांच्या या कृत्याचा कॉंग्रेस पक्ष निषेध करीत असून पक्षाचा व्हीप धुडकावल्याने विश्‍वजित राणे यांच्या विरुद्ध अपात्रतेचा अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती खलप यांनी दिली.
या क्षणी भाजप यशस्वी झाला तरी जनमानसात या पक्षाची प्रतिमा मलीन झाली आहे. भाजप मुकूट घेऊन जात आहे, त्यावर त्यांचा अधिकार नाही, असे ते म्हणाले. पर्येचे आमदार तथा विश्‍वजित यांचे वडील प्रतापसिंह राणे यांची भूमिका काय आहे, असे विचारले असता, ते पक्षाचे निष्ठावंत सेवक असून त्यांना याक्षणी सहानुभूती व्यक्त करणे हेच उचित ठरेल, असे खलप म्हणाले. गेल्या ५० वर्षांच्या काळात राणे कुटुंबावर गोमंतकीयांनी प्रेम केले. त्यांच्यावर भाजप राजवटीतही अन्याय केला नाही. असे असताना विश्‍वजित यांनी आपल्या घराण्याच्या प्रतिष्ठेचा आदर करणे गरजेचे होते, असे खलप म्हणाले. पत्रकार परिषदेस एम. के. शेख व विजय पै उपस्थित होते.