विश्वधर्माचा उपासक

0
6

गेली किमान सहा दशके तबल्यावर बेभानपणे थिरकणारी बोटे काल कायमची थांबली. ताल थांबला, त्याच्या जोडीने पुटपुटले जाणारे बोल थांबले, वाजवण्याच्या नादात भान हरपून मानेला, केसांना दिले जाणारे ते डौलदार हिसके थांबले. झाकीर हुसेन कुरेशी नावाच्या एका अवलिया कलाकाराला आपण कायमचे अंतरलो. ज्या महान कलाकारांनी भारतीय संगीत आणि वाद्यांची ध्वजा सप्तखंडांमध्ये रोवली आणि कीर्ती दशदिशांत पसरवली, त्यातलेच हे एक पिस वाऱ्यावर लहरत काल आपल्यापासून कायमचे दूर गेले आहे. पं. रविशंकर, अली अकबर खाँ, पं. शिवकुमार शर्मा अशा दिग्गज कलाकारांनी सतार, सरोद, संतूर अशा एकेका भारतीय वाद्याचा परिचय जगाला घडविताना आपले आयुष्य वेचले. तबल्यासारख्या एका भारतीय तालवाद्याची ओळख पाश्चात्य जगताला खरे तर उस्ताद अल्लारखाँनी आधीच करून दिलेली होती, पण आपल्या पित्याच्या पश्चात ह्या तबल्याच्या तालावर अवघ्या जगाला वेड लावण्याची किमया जर कोणी केली असेल, तर ती उस्ताद झाकीर हुसेन यांनी. पिता अल्लारखाँ हे तर महारथीच. अर्थात, पिता महान कलाकार असला म्हणून पुत्र कर्तृत्ववान निपजतोच असे नाही. परंतु झाकीरच्या कानात अजान ऐकवण्याआधी पित्याने ऐकवलेले तबल्याचे बोल त्या बालकाने असे काही मनात साठवले आणि पुढे बोटांतून उतरवले की त्या बेभान वादनाकडे जग अवाक होऊन बघतच राहिले. झाकीर यांची तबल्यावरून फिरणारी ती बोटे नसायचीच मुळी. जणू आकाशीची सौदामिनीच त्या बोटांतून तडतडायची. उगाच नाही स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांनी पणजीत कला अकादमीतील कार्यक्रमात झाकीरचे तुफानी तबलावादन ऐकून धन्यता वाटल्याने आपल्या बोटातली हिऱ्याची अंगठी एका क्षणाचाही विचार न करता त्यांच्या बोटात सरकवली होती. एका महान कलाकाराने दुसऱ्या महान कलाकाराला दिलेली ती सहजस्फूर्त दाद होती. झाकीर हा तबलानवाज अल्लारखाँचा मोठा मुलगा. झाकीरचे धाकटे बंधू तौफिक कुरेशी आणि फझल कुरेशी हेही पित्याच्या पावलांवर पाऊल टाकून तालांच्या दुनियेच्या सफरीवरच आहेत. परंतु झाकीर यांना जी कीर्ती लाभली ती काही और होती. वयाच्या तिसऱ्या वर्षी तबल्यावर त्यांची इवली बोटे पडली. सातव्या वर्षी त्यांनी पहिले तबलावादन केले आणि अकराव्या वर्षी पहिला सांगीतिक दौरा केला. विसाव्या वर्षी तर पं. रविशंकरांबरोबर थेट अमेरिकेत पोहोचले आणि आपल्या तबलावादनाने पाश्चात्य श्रोत्यांना वेडे केले. एकीकडे पं. भीमसेन जोशींपासून बिरजू महाराजांपर्यंत एकेका महान कलाकारांना साथसंगत करताना दुसरीकडे, जॉन मॅक्लॉनिन, मिकी हार्ट, हर्बी हन्कॉक, एरिक हलेंड अशा पाश्चिमात्य संगीतकारांशी झाकीर यांचे मैत्र जुळले आणि त्यातून पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संगीताचा मिलाफ घडवणारे अनोखे सांगीतिक प्रयोगही जन्माला आले. ‘शक्ती’सारखा वाद्यवृंद उभा राहिला. एकीकडे भारतीय श्रोत्यांना आपल्या वादनकौशल्याने स्तिमित करणारे झाकीर तिकडे परदेशांमधून तेथील जॅझ आणि रॉकप्रेमींना तबल्याच्या तालावर थिरकवू लागले. बॉलिवूडलाही झाकीरच्या वादनाची मोहिनी पडली. त्यातून ‘साज’ सारख्या चित्रपटामध्ये संगीतच नव्हे, तर प्रमुख भूमिकाही त्यांच्याकडे चालून आली. ताजमहाल चहाच्या एका जाहिरातीने तर झाकीर हुसेन हे नाव भारतात घरोघरी पोहोचवले. त्यांचे तबलावादन अद्वितीय तर होतेच, परंतु वेगळ्या संस्कृतीत वाढलेल्या वेगळ्या परंपरेच्या श्रोत्यांना भारतीय संगीताची त्यांनी जी ओढ लावली, ती त्यांची कामगिरी त्याहून मोठी मानायला हवी. झाकीर यांचे तबलावादन केवळ श्रवणीय नसायचे. ते तितकेच प्रेक्षणीयही असे. तबला वाजवतानाचे त्यांचे त्यात गुंगून जाणे, इतका प्रदीर्घ अनुभव असूनही स्वतःच स्वतःशी बोल पुटपुटणे हे पाहताना श्रोत्यांना त्यांचे सांगीतिक समर्पण जाणवल्यावाचून राहत नसे. खरे तर झाकीरना भारताचे पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे तिन्ही सर्वोच्च नागरी सन्मान लाभले. संगीताचे ऑस्कर गणले जाणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील चार ग्रॅमी सन्मानही त्यांना मिळाले. त्यापैकी तीन ग्रॅमी तर त्यांना एकाचवेळी 66 व्या सोहळ्यात मिळाले होते. परंतु ह्या सर्वांहून मोठा सन्मान त्यांना लाभलेला आहे तो म्हणजे कोट्यवधी भारतीयांच्या ह्रदयात त्यांना असलेले प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे स्थान. एक मुसलमान असूनही ना त्यांचा धर्म कधी रसिकांच्या त्यांच्यावरील प्रेमाच्या आड आला, ना त्यांना त्यांच्या धर्माने कधी भारतीय संस्कृतीचा अभिमान मिरवण्यापासून रोखले. शेवटी संगीत हाच एक विश्वधर्म आहे आणि त्याला देशांच्या, प्रांतांच्या, धर्मांच्या, जातींच्या सीमा नसतात हेच झाकीर हुसेन यांचे जीवन कर्तृत्व दाखवून देत नाही काय?