विश्वजीत राणे यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

0
3

राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे काल भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये राज्यातील राजकीय व इतर विषयांवर चर्चा झाली. विश्वजीत राणेंनी पंतप्रधानांची भेट घेतल्याने राजकीय पातळीवर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, राणेंनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली.

राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्री, आमदार केंद्रीय पातळीवरील भाजपचे मंत्री, नेते यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यादरम्यानच विश्वजीत राणे यांनी थेट पंतप्रधानांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. पंतप्रधान आणि माझे गुरू नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा सन्मान मिळाला. त्यांच्या परिवर्तनशील दृष्टिकोन आणि देशाच्या प्रगतीसाठी अखंड प्रयत्नातून प्रेरणा मिळते, असे विश्वजीत राणे यांनी भेट घेतल्यानंतर जारी केलेल्या वक्तव्यात म्हटले आहे. राणे यांनी पद्मश्री परेश मैती यांनी रेखाटलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा त्यांना या भेटीवेळी प्रदान केली.