- शंभू भाऊ बांदेकर
फिफा मानांकनास आपल्या संघाला सध्या ९७ वे मानांकन असल्यामुळे यश अजून फार दूर आहे. याचे कारण देशभर लाखो, करोडो फुटबॉल शौकीन असले आणि आपल्या प्रचंड मोठ्या देशात कोट्यवधी लोक राहत असले तरी हा खेळ मात्र, पूर्व भारत, प. बंगाल, केरळ आणि आपला गोवा या किनारपट्टीवरील राज्यांचा अपवाद वगळता फारसा कुठे खेळला जात नाही.
दर चार वर्षांनी फुटबॉलचा जागतिक महाकुंभमेळा अर्थात विश्वचषक फुटबॉल स्पर्धांचे आयोजन केले जाते. यंदाचा हा महाकुंभमेळा १४ जून पासून रशियामध्ये सुरू झालेला आहे आणि यजमान रशियाने पहिल्या दिवसाच्या पहिल्याच सामन्यात सौदी अरेबियाचा पराभव करून थाटात आपल्या राष्ट्रातील स्पर्धेला सुरुवात केली आहे.
जगात सर्वत्र क्रिकेट लोकप्रिय आहे हे खरे, पण फुटबॉल खेळ मात्र जागतिक स्तरावरील सर्वाधिक लोकप्रिय खेळ असून जगभरातील सुमारे २११ देशांतील जवळपास २७ कोटी लोक प्रत्यक्ष फुटबॉल खेळतात. यातील प्रत्येक २५ लोकांमधील एक जण फुटबॉलपटू असतो. युरोप व लॅटिन अमेरिकेमध्ये तर प्रत्येक ६ जणांमध्ये एक जण फुटबॉलपटू असतो. एका अंदाजानुसार यंदाची फुटबॉल विश्वचषक स्पर्धा तब्बल साडेतीनशे कोटी चाहते पाहणार आहेत. यावरून विश्वचषक २०१८ च्या फुटबॉल स्पर्धेच्या लोकप्रियतेची कल्पना यावी.
यावेळच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे फुटबॉल विश्वचषक जिंकणार्या विजेत्या संघाला २५५ कोटी रुपयांचे इनाम दिले जाणार असून उपविजेत्यांना १८८ कोटी रुपयांनी सन्मानित केले जाणार आहे. तिसर्या स्थानावरील संघाला १६१ कोटी तर चौथ्या क्रमांकावरील संघाला १४८ कोटी रुपयांचे इनाम मिळणार आहे. याशिवाय ५ ते ८ क्रमांकावरील प्रत्येक संघाला प्रत्येकी १०७ कोटी तर ९ ते १६ क्रमांकावरील प्रत्येक संघांना प्रत्येकी ८१ कोटी रुपयांचे इनाम देण्यात येणार आहे. अशा प्रकारे कोट्यवधी चाहत्यांच्या या खेळाला कोट्यवधी रुपयांची पायघडी घालून खेळाडू, संघ आणि चाहत्यांना या खेळाचा मनमुराद आनंद लुटता यावा, अशी सोय करण्यात आली आहे.
तब्बल ३२ दिवस चालणार्या या महासंग्रामात फुटबॉलमुळे अवघे जग ढवळून निघणार आहे. शिवाय विविध खंडनिहाय दिग्गज संघांची व खेळाडूंची ताकद देखील पणाला लागणार आहे. आतापर्यंत युरोप खंड ज्यामध्ये रशिया, फ्रान्स, पोर्तुगाल, जर्मनी, इंग्लंड, पोलंड, स्पेन, स्वीडन, डेन्मार्क हे देश आघाडीवर आहेत आणि दक्षिण अमेरिकेा, ज्यामध्ये ब्राझील, उरुग्वे, अर्जेंटिना, कोलंबिया हे देश आघाडीवर आहेत यांच्यामध्येच विश्वचषक स्पर्धा अंतिम टप्पा गाठील की आशिया ज्यामध्ये इराण, दक्षिण कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया या आघाडीच्या देशांचा समावेश होतो त्यापैकी की, उत्तर अमेरिका ज्यामध्ये मेक्सिको, कोस्टारिका यांचा विशेषत्वाने समावेश होतो ते देश की आफ्रिका खंडातील नायजेरिया, इजिप्त, मोरोक्को या देशांचा विशेष करून समावेश होतो, ते आघाडी घेतील हे पाहण्यासाठी त्या त्या देशांचे सामने पाहून डोळ्यांचे पारणे फेडत असतानाच त्यांचे हल्ले, प्रतिहल्ले, गोलकीपरची कामगिरी, रफ खेळातील पिवळे कार्ड, लाल कार्ड, रेफ्रीची करामत आणि सगळे चक्षुर्वैसत्यम पाहून मन सुखावणार आहे. आपल्याला जो देश जेता व्हावा असे वाटते व मोठ्या आतुरतेने आपण त्यांचा सामना बघतो, तो जिंकला तर आनंद अन् हरला तर दु:खाचे चटकेही आपणास सहन करावे लागणार आहेत.
मॉस्कोतील ८० हजार आसन क्षमता असलेल्या देखण्या स्टेडियमवर १४ जूनला रंगारंग वातावरणात उद्घाटन सोहळा संपन्न झाला. तो ज्यांनी पाहिला ते मनापासून सुखावले, कारण यंदाच्या विश्वचषकासाठी खास तयार करण्यात आलेल्या ‘लिव्ह इट ऍप’ या गाण्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन गेले, तसेच ब्रिटनचा रॉकस्टॉर रॉबी विलियम्स व रशियन गायिका एडा गरफुल्लीन यांच्या सादरीकरणानंतर मॉडेल व्हिक्टोरिया लेपेरेया ही फुटबॉल घेऊन मैदानात उतरली. त्यानंतर ब्राझीलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डो याने फुटबॉलला किक मारली आणि विश्वचषक पाहणार्या संपूर्ण जगाला जणू फुटबॉलची कीक आल्याचा भास झाला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन आणि फिफा चे अध्यक्ष जियान्नी इन्फेटिनो यांनी अधिकृत घोषणा केली आणि टाळ्यांचा जणू पाऊस पडला.
फिफाच्या आकर्षक व भव्यदिव्य विश्वचषक स्पर्धेसाठी जगातील एकूण ३२ संघ जेतेपद खेचून आणण्यासाठी दिमाखात, मोठ्या निर्धाराने मैदानात उतरलेले आपणास दिसतील. हे सामने पाहण्यासाठी तब्बल दहा हजार भारतीय मॉस्कोत दाखल झाले आहेत. शिवाय देशभरातील लाखो लोक दूरदर्शनसमोर बसून सामन्यांचा आनंद लुटणार आहेत. भारतीयांबाबत हे खरे असले तरी या स्पर्धा पाहण्यासाठी रात्री जागवाव्या लागणार्या फुटबॉल शौकिनांना भारत कुठे, हा प्रश्न मात्र सतावणारा आहे. ज्या भारताने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतही आपले नाव जागतिक स्तरावर झळाळत ठेवले, ती झळाळी फुटबॉलमध्ये केव्हा येणार, याची खंत प्रत्येक भारतीय फुटबॉलपटूंना व फुटबॉल शौकिंनाना असल्यास नवल ते काय?
फुटबॉल हा खेळ जगभरातील एकूण २१० देशांमध्ये खेळला जातो आणि हे सारे देश विश्वचषकाच्या पात्रता स्पर्धेत खेळतात आणि ही पात्रता स्पर्धाही अनेक महिने चालते आणि त्यानुसार कुठे प्रत्यक्ष विश्वचषकासाठी खेळणारे शेवटचे ३२ संघ निवडले जातात. ही पात्रता म्हणजे सुद्धा एका महासंग्रामाला तोंड देण्यासारखीच असते. आपल्या भारताबाबत महासंग्रामाला सामोरे जाण्याचे तर सोडून द्या, पण पात्रता फेरीत आशिया गटही आपल्याला यशस्वीरीत्या ओलांडता आलेला नाही.
तसे पाहता आतंरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये भारताचा संघ अनेक वर्षे कार्यरत आहे. फिफा आणि आशियाई फुटबॉल फेडरेशनच्या स्वायत्ततेखालील हा संघ दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशनचा देखील एक भाग आहे, पण फिफा मानांकनास आपल्या संघाला सध्या ९७ वे मानांकन असल्यामुळे यश अजून फार दूर आहे. याचे कारण देशभर लाखो, करोडो फुटबॉल शौकीन असले आणि आपल्या प्रचंड मोठ्या देशात कोट्यवधी लोक राहत असले तरी हा खेळ मात्र, पूर्व भारत, प. बंगाल, केरळ आणि आपला गोवा या किनारपट्टीवरील राज्यांचा अपवाद वगळता फारसा कुठे खेळला जात नाही. मात्र, देशभरात सर्वत्र हा खेळ खेळल्यास तो सर्वदूर पसरेल व संपूर्ण देशातून उत्तम खेळाडू आपल्यात निर्माण होतील, तेव्हाच आपली धडगत आहे. तरीही आपल्या देशात दिवसेंदिवस या खेळाचे खेळाडू आणि चाहते वाढतच आहेत, हेही नसे (तूर्तास) थोडके.
काही का असेना, विश्वचषक फुटबॉलच्या या थरारामध्ये आपला भारतीय (निदान खेळ पाहण्यासाठी) सामील होतोय आणि मग इतर देशांप्रमाणेच आपल्या देशातही कोण जिंकेल, कुठचा खेळाडू ‘हिरो’ ठरेल. कुठला गोलकीपर ‘झिरो’ ठरेल, अशा कित्येक विषयांवर चर्चा झडतील. चला तर मग संपूर्ण जगातल्या फुटबॉलप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या या २०१८ च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आपणही सामने बघण्यासाठी सामील होऊया.