>> चुरशीच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडवर 70 धावांनी विजय
>> विराट कोहलीचे 50 वे विक्रमी शतक, शमीचे 7 बळी
विराट कोहलीने झळकावलेले विक्रमी 50 वे शतक, श्रेयस अय्यरचे तुफानी शतक आणि त्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने घेतलेल्या 7 बळींच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत एकदिवशीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
या विजयाबरोबरच टीम इंडियाने 2019 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूजीलंडकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाचा वचपाही काढला. यासह टीम इंडियाने चौथ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरी गाठली आहे. आता भारतीय संघ येत्या रविवारी 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्ये अंतिम सामना खेळणार असून दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी लढत देणार आहे.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना चार गडी गमावून 397 धावा केल्या. प्रत्युत्तरात किवी संघाने सर्वबाद 327 धावा केल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर रोहीत शर्मा आणि शुबमन गील यांनी भारताच्या डावाची आक्रमक सुरूवात केली. रोहीतने यावेळी न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर सुरुवातीपासूनच हल्ला चढवला. घरच्या मैदानावर खेळताना त्याने 4 चौकार व 4 षटकारांच्या साहाय्याने फक्त 29 चेंडूत 47 धावा केल्या.
विराटचे विक्रमी शतक
रोहीत बाद झाल्यानंतर विराट कोहलीचे मैदानात आगमन झाले. 23व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शुबमन रिटायर्ड हर्ट झाला. गीलच्या मदतीला फिजिओ मैदानात आले होते. मात्र फिजिओसोबत चर्चा करून गीलने मैदान सोडले. गीलने 65 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांसह 79 धावा केल्या. कोहलीने यावेळी 50 वे शतक साजरे करत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक दिवशीय सामन्यांतील 49 शतकांचा जागतिक विक्रम मोडला. कोहलीने यावेळी 113 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर 117 धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. कोहली बाद झाल्यावर श्रेयसने आपले शतक साजरे केले. श्रेयसने 70 चेंडूंत 105 धावांची धमाकेदार शतकी खेळी साकारली. श्रेयस आणि विराट यांनी तुफानी फलंदाजी
केली.
भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 117 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने 105 धावांची खेळी केली. शुबमन गीलने नाबाद 80 धावांचे योगदान दिले. कर्णधार रोहितने 47 आणि लोकेश राहुलने नाबाद 39 धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने तीन आणि ट्रेंट बोल्टने एक बळी घेतला.
न्यूझीलंडची खराब सुरूवात
भारताने दिलेल्या 398 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात अतिशय खराब झाली. न्यूझीलंडच्या सलामीच्यादोन्ही फलंदाजांना शामीने बाद करत सुरूवातीलाच धक्के दिले. डेवेन कॉनवे याला फक्त 13 धावा करता आल्या. रचिन रवींद्र यालाही मोठी खेळी करता आली नाही. रचिन रवींद्र याने 22 चेंडूत 13 धावा केल्या. 39 धावांत न्यूझीलंडचे दोन्ही सलामी फलंदाज माघारी परतले. पण त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि डॅरेल मिचेल यांनी झुंज दिली. केन विल्यमसन आणि डॅरेल मिचेल यांनी भारताच्या गोलंदाजांचा प्रतिकार केला. केन विल्यमसन याने संयमी फलंदाजी केली तर डॅरेल मिचेल याने तुफानी फलंदाजी केली. या जोडीने 181 धावांची भागिदारी केली. ही जोडी मैदानावर होती, तोपर्यंत सामना न्यूझीलंड जिंकेल असेच वाटत होते. पण शमीने एकाच षटकात दोन फलंदाजांना तंबूत पाठवत परत भारताला विजयाची चाहूल दिली. शमीने आधी जम बसेलेल्या केन विल्यमसनला तंबूत पाठवले. त्यानंतर टॉम लॅथम याचाही अडथळा दूर केला. केन विल्यमसन याने 73 चेंडूत 69 धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि आठ चौकारांचा समावेश होता.
विल्यमसन याच्यानंतर टॉम लेथमही शून्यावरच परतला. लेथम गेल्यानंतर ग्लेन फिलिप्सने डॅरेल मिचलला साथ दिली. डॅरेल मिचेल याने ग्लेन फिलिप्स याला हाताशी धरत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पाचव्या विकेट्ससाठी या दोघांमध्ये 61 चेंडूत 75 धावांची भागिदारी झाली. ही जोडी धोकादायक ठरत असतानाच बुमराहने ग्लेन फिलिप्सला बाद केले. फिलिप्सने 33 चेंडूत दोन षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 41 धावांची खेळी केली. फिलिप्स तंबूत परतल्यानंतर मार्क चॅम्पमनही तंबूत परतला त्याला कुलदीपने तंबूचा रस्ता दाखवला. चॅम्पमन बाद झाल्यानंतर शमीने जम बसलेल्या डॅरेल मिचेल यालाही बाद करत भारताच्या विजय निश्चित केला. अष्टपैलू मिचेल सँटनर यालाही फक्त आठ धावांचे योगदान देता आले, त्याला सिराजने बाद केले.
- रोहीतचे सर्वाधिक षटकार
या सामन्यात रोहीतने एका विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारण्याचा गेलचा विक्रम मोडताना त्याने आतापर्यंत 27 षटकार ठोकले आहेत. गेलने 2015च्या विश्वचषकात 26 षटकार मारले होते. - कोहलीचे शतकांचे अर्धशतक
भारताचे रनमशीन विराट कोहली याने या सामन्यात शतक झळकावताना मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या एकदिवशीय सामन्यातील 49 शतकांचा विक्रम मोडताना 50 व्या शतकाला गवसणी घातली. - शमी सामनावीर
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने भेदक मारा करताना 9.5 षटकात 57 धावांच्या मोबदल्यात न्यूझीलंडच्या सात फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कार बहाल करण्यात आला. - शमी ठरला अव्वल
विश्वचषक स्पर्धेत काल न्यूझीलंडविरुद्धच्या सात बळी घेतल्यानंतर आता मोहम्मद शमी गोलंदाजीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने एकूण 23 बळी मिळवले आहेत.