‘विशेष’ हे विशेषण कां?

0
286
  •  वृंदा मोये
    (संचालिका आनंद निकेतन, म्हापसा)

त्याच क्षणी मनात एक प्रश्‍न डोकावला की कशासाठी या निष्पाप मुलांना आपण ‘वेगळी’ म्हणून संबोधतो? कारण पालक, शिक्षक किंवा समाजातील एक सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वांनी मिळून या मुलांना योग्य दिशा दाखविल्यास ही मुलं प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहतात. गरज आहे ती फक्त आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची.

‘डाऊन सिंड्रोम’ किंवा मंगोलिझम हे एक समाजात सर्रासपणे नजरेत येणारे व्यंगत्व आहे. निसर्गनियमांमधील अपवादात्मक अपघातामुळे ४६ क्रोमोसोम्सऐवजी ४७ क्रोमोसोम्सची निर्मिती होते. एका ज्यादा क्रोमोसोममुळे जन्माला येणार्‍या अर्भकाच्या शरीराची व मेंदूची ठरावीक पद्धतीने होणारी वाढ बिघडते. अशा मुलांची बौद्धिक क्षमता सर्वसाधारण मुलांपेक्षा कमी असते. या मुलांचा बौद्धिक विकास, मानसिक प्रगती आणि सामाजिक कौशल्य हे मैलाचे दगड सामान्य मुलांच्या तुलनेत खूप उशिराने सुरू होतात. सामान्य मुलांमध्ये हे सगळं त्या त्या वयानुसार आपोआप होत जातात.

शरीराच्या सर्व हालचाली लवकर होत नसल्याने या मुलांच्या सूक्ष्म स्नायूंचा विकास करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात. या मुलांचा चेहरा विशिष्ट प्रकारचा असतो. त्यांच्या तळव्यांना व तळपायांना आपल्यासारखे उंचवटे व सखोल भाग नसतो.
आनंद निकेतन या आमच्या विशेष शाळेमध्ये डाऊन सिंड्रोमने ग्रासलेली एकूण दहा-बारा मुलं आहेत. अगदी बारकाईने या मुलांचं निरीक्षण केलं तेव्हा जाणवलं की यांच्यामध्ये एक प्रकारचा शिस्तबद्धपणा आहे. काही गोष्टी मला त्यांच्यामध्ये जाणवल्या, त्या अनपेक्षित पण नक्कीच कौतुकास्पद होत्या- जसे आपल्या वस्तू जिवापाड सांभाळणे, घेतलेल्या वस्तू परत जागच्या जागी ठेवणे, आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलांकडे लक्ष देणे, जमेल तशी त्यांची काळजी घेणं आणि दुसर्‍यांना लळा लावणं. लगेच ही मुल्‌ं इतरांना आपलंसं करून घेतात. अशा काही गोष्टी खरोखर आपल्यासारख्या सामान्य माणसांनी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत.
आमच्या शाळेत प्रवेश घेतलेला पहिला विद्यार्थी मनोज, हा डाऊन सिंड्रोमग्रस्त होता. त्या वेळेस म्हणजे २०११ साली त्याचं वय ५-६ वर्षाचं होतं. गोल चेहरा, छोटंसं कपाळ, किलकिले डोळे असलेला मनोज, अत्यंत गोड आणि निरागस वाटत होता. आम्हा सगळ्यांचंच लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी प्रयत्न करत होता. मनोजचे आईवडील दोघंही उच्चशिक्षित. उच्च पदांवर काम करणारे, सुसंस्कृत. दोन मुलं- मनोज आणि त्याच्या पाठीमागून जन्मलेला आयुष. चौकोनी कुटुंब पण अत्यंत व्यस्त. डाऊन सिंड्रोमचा मुलगा आहे हे कळल्याबरोबर दोघांनाही धक्का बसला. हे सत्य स्वीकारणं कठीण होतं. परंतु मनोजच्या आईवडलांनी एकमेकांना धीर देत या परिस्थितीला धैर्यानं सामोरं जाण्याचा निर्णय घेतला आणि मनोजला आयुषप्रमाणेच समाजात जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी दोघांची धडपड सुरू झाली.

म्हापशामध्ये ‘आनंद निकेतन’ या विशेष शाळेची सुरुवात होण्याआधी दुसरी कुठलीही विशेष मुलांची शाळा नव्हती. पण तरीदेखील मनोजच्या आईवडलांनी खचून न जाता घरसंसार, नोकरी आणि मनोजसाठी म्हापसा ते पणजी येथील विशेष शाळा अशी तारेवरची कसरत करत २-३ वर्षं काढली आणि ज्यावेळी म्हापशामध्ये ‘आस्था’ संचलीत ‘आनंद निकेतन’ ही विशेष मुलांची शाळा सुरू झाली त्यावेळी रीतसर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून मनोजला त्याच्या आईवडिलांनी आमच्या स्वाधीन केलं. मनोज हा आमच्या शाळेतील पहिला विद्यार्थी होेता. त्यावेळेस एका छोट्याशा भाड्याच्या घरामध्ये आमची शाळा सुरू झाली होती. मनोजही न चुकता रोज शाळेमध्ये येत असे.

सुरुवातीपासूनच मनोज सगळ्या उपक्रमात चांगला प्रतिसाद द्यायचा. मुळातच त्याला गाणी, चित्र काढणे यामध्ये विशेष रस होता. कुठूनही गाण्याचे स्वर कानी पडले तर लगेच टेबलावरती किंवा स्वतःच्या गुडघ्यावरती आपल्या चिमुकल्या बोटांनी जमेल तसा ताल धरायचा. याचबरोबर त्याच्या मनात असलेला एक प्रकारचा ‘फोबिया’ आम्हाला जाणवला होता. शाळेत आल्यापासून तो पायर्‍या चढण्या-उतरण्यात खूप घाबरत होता. परंतु काही महिन्यातच शिक्षकांच्या मदतीने हळुहळू त्याच्यातील फोबियावर मात करण्यास आम्हाला यश आलं. शिक्षक रोज मनोजच्या हाताला धरून त्याच्याकडून पायर्‍या चढून आणि उतरवून घेत असत. संगीतातील त्याची रुची पाहून मनोजच्या आईवडलांनी त्याला संवादिनी शिकविण्यास सुरुवात केली. बघता बघता काही महिन्यांतच मनोज सुरांमध्ये आनंदाने रमू लागला. संवादिनीवर त्याची बोटं सफाईदारपणे अलगद फिरू लागली. शाळेमध्येही संगीत शिक्षक मनोजकडून नियमितपणे संवादिनीचा सराव करून घेऊ लागले. आणि सांगण्यास अतिशय आनंद होतो की आज मनोज सराईतपणे आपलं राष्ट्रगीत तसेच ३-४ अभंग सफाईदारपणे संवादिनीवर वाजवू शकतो. शाळेतील रोजच्या प्रार्थनेच्या वेळी म्हटल्या जाणार्‍या राष्ट्रगीताला संवादिनीवर मनोजचीच साथ असते. याचबरोबर वर्गातील इतर मुलांच्या तुलनेने मनोज अभ्यासातही जरा पुढेच होता. शिक्षिका पुस्तकातील शब्द किंवा छोटी छोटी वाक्य वाचून दाखविताना लक्ष देऊन ऐकत होता.

एकदा अशीच माझ्या रोजच्या सवयीप्रमाणे मी प्रत्येक वर्गामधून जात होते. त्याचवेळेस मनोज आपल्या शिक्षिकेबरोबर बसून पुस्तकातील एक परिच्छेद वाचत होता. मी बाजूलाच उभी राहून ऐकत होते. मनोजचे शब्दोच्चार स्पष्ट नव्हते, पण समजण्याइतपत स्पष्ट नक्कीच होते. वाचून झाल्यानंतर मी कुतुहलाने त्याला त्या परिच्छेदाचा अर्थ विचारला आणि मला आश्‍चर्याचा धक्काच बसला. मनोजने प्रत्येक वाक्यातील शदाचा अर्थ मला शिक्षिकेने त्याला जसा सांगितला होता तसाच अगदी न चुकता सांगितला. मी अवाक् झाले. मनोजची ही शिकाऊ वृत्ती पाहून आपल्या आजुबाजूला असलेल्या अनेक नॉर्मल मुलांची मला कीव करावीशी वाटली. त्या दयाळू विधात्याने इतकं धडधाकट शरीर, बुद्धी, एकापेक्षा एक अशा वेगवेगळ्या क्षमता आणि प्रत्येकाच्या समोर आ वासून उभं असलेलं सुंदर जीवन बहाल केलेलं असताना केवळ अभ्यास करून यश मिळवण्यात कशी कुचराई करतात आणि शेवटी परीक्षेत अपयश आलं म्हणून कधीकधी आपलं जीवनही संपवून टाकतात.. अशा अनेक बातम्या कानावर येत असतात. त्याच क्षणी मनात एक प्रश्‍न डोकावला की कशासाठी या निष्पाप मुलांना आपण ‘वेगळी’ म्हणून संबोधतो? कारण पालक, शिक्षक किंवा समाजातील एक सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वांनी मिळून या मुलांना योग्य दिशा दाखविल्यास ही मुलं प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहतात. गरज आहे ती फक्त आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची, मोठ्या मनाने त्यांना स्वीकारण्याची आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सामावून घेण्याची. या मुलांना ‘वेगळं’ समजून सहानुभूतीची गरज नसते तर गरज असते ती आपुलकी, माया, प्रेम आणि पाठिंब्याची आणि ‘वेगळं’ या शब्दाच्या परिघातून बाहेर काढण्याची आणि नेमकं हेच कार्य ‘आस्था’ संचलीत ‘आनंद निकेतन’ ही विशेष मुलांची शाळा करते आहे.