विशेष मुलांच्या होंडा शाळेला एसीजीएल कंपनीकडून बस

0
97

होंडा (न. वा.)
लोकविश्‍वास प्रतिष्ठानचे विशेष मुलांसंदर्भातील कार्य वाखाण्यासारखे आहे. त्यांचे शिक्षक व इतर कर्मचारी सेवाभावी वृत्तीने कार्य करतात. अशा संस्था दानशूर व्यक्ती किंवा संस्थांच्या सहकार्यावर चालू शकतात. अशा संस्थांनी सरकारी मदतीची अपेक्षा धरू नये. कारण सरकारकडे तशी कायदेशीर तजवीज नाही असे विचार होंडा येथे सभापती डॉ. प्रमोद सावंत मांडले. एसीजीएल होंडा कंपनीकडून लोकविश्‍वास प्रतिष्ठानच्या वडदेवनगर शाळेला मुलांची प्रवासी वाहतूक करण्यासाठी बस प्रदान करण्यात आल्याबद्दल सभापती सावंत यांनी कंपनीला धन्यवाद दिले. मात्र या बसच्या चालकाचा व इंधन खर्च संबंधित शाळेने उचलायचा आहे. संस्थेला हे शक्य नसून मी स्वत: इंधन व चालकाचा खर्च उचलणार आहे अशी ग्वाही प्रमोद सावंत यांनी यावेळी दिली. ही बस खास विशेष मुलांसाठी असून पाळी-वेळगे-सुर्ला भागातील विशेष मुलांनी त्याचा लाभ घ्यावा असे सूचित करण्यात आले आहे.
व्यासपीठावर यावेळी लोकविश्‍वास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनूप प्रियोळकर, लोकविश्‍वास प्रतिष्ठानच्या वडदेवनगर शाळेच्या इनचार्ज रती रायकर, पालक शिक्षक समितीचे अलका भिगुर्डे, श्रीमती कुंभार, श्यामसुंदर साखळकर, गुरूदास सामंत आदी उपस्थित होते.
सुरूवातीला श्री. प्रियोळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. एसीजीए कंपनी आणि सभापती प्रमोद सावंत यांची यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. शाळेसंदर्भातील योजना व इतर कार्याची ओळख करून दिली. विशेष मुलांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. सभापती प्रमोद सावंत यांनी गाडीची पूजा करून व श्रीफळ वाढवून बसचे उद्घाटन केले. सूत्रसंचालन गुरूदास सामंत यांनी केले. मनीला नाईक यांनी आभार मानले.