विशेष दर्जासंबंधी समिती स्थापणार

0
101

गोव्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीच्या प्रस्तावावर अभ्यास करण्यासाठी येत्या सोमवारी समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल दिली.
या समितीवर तज्ज्ञाचा तसेच या विषयाशी संबंधित असलेल्यांचा समावेश असेल. समिती स्थापन केल्यानंतर समिती जनतेकडून सूचना मागवेल. त्यासाठी महिनाभराची मुदत दिली जाईल. या सूचनांनुसार अभ्यास करून तयार केलेला अहवाल घेऊन केंद्रीय गृहमंत्री व अन्य संबंधित मंत्र्यांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ दिल्लीला घेऊन जाणार असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.गोमंतकीय जनतेची ही दीर्घकालीन मागणी असून ती पूर्ण व्हावी म्हणून सरकारचा प्रयत्न असेल, असे पर्रीकर यांनी सांगितले. दरम्यान, ‘मुव्हमेन्ट फॉर स्पेशल स्टेटस’ या संघटनेचे अध्यक्ष ऍड. आंतोन लोबो यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले. त्यात कृषी जमिनीचे संरक्षण करणे, स्थानिकांनाच रोजगार, स्थलांतरितांना शिधापत्रिका देण्यास मनाई, मतदार यादीतून स्थलांतरितांची नावे वगळणे व ‘गोंयकारपण’ सांभाळण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.