>> गोवा हे पहिले राज्य, मुख्यमंत्र्यांहस्ते उद्घाटन
राज्य सरकार विवाह नोंदणी दस्तऐवज ऑन लाईन पद्धतीने उपलब्ध करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते काल करण्यात आला आहे. याप्रसंगी कायदा मंत्री नीलेश काब्राल व इतर अधिकारी उपस्थित होते.
विवाह नोंदणीची ऑन लाईन पद्धतीने १९१४ ते २०१० पर्यतची प्रमाणपत्रे आता उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यापुढील दस्तऐवज अपडेट करण्याचे काम सुरू असून आगामी तीन महिन्यात सेवा पूर्ण अद्ययावत केली जाणार आहे. या ऑन लाईन सेवेसाठी विवाह नोंदणीच्या ८ लाख ६० हजार पृष्ठांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. हैदराबाद येथील एका आयटी कंपनीची २०१० मध्ये हे काम दिले होते. विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी ऑन लाइन सेवा उपलब्ध करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.