विवाह ः व्यवहार नव्हे; संस्कार!

0
16
  • पौर्णिमा केरकर

हुंडा प्रथेवर कायद्याने बंदी आणली, मात्र ही कीड समाजाला आजही आतून पोखरून काढत आहे. आज तिचे स्वरूप बाह्य भपक्याने पैसा-प्रतिष्ठेची झूल पांघरून घेत पुढे जात आहे. गोव्यासारखे छोटे सुशिक्षित आणि आर्थिक जीवनस्तर उच्च असल्याचे मानले जाणारे राज्यही याला अपवाद नाही, याचीच खंत वाटते.

मानवी समाजजीवनातील एक महत्त्वाची संस्था म्हणजे विवाहसंस्था. सोळा संस्कारांमध्ये तिला एकेकाळी अनन्यसाधारण महत्त्व होते. विवाहामुळे दोन मनांबरोबरच दोन कुटुंबांचेही मिलन होते. पती-पत्नीच्या नात्याचे नियमन होत जाते. विवाहसंस्थेवरच कुटुंबसंस्था अवलंबून असल्याने त्यावर नैतिक संस्कारांची जबाबदारी परंपरेने येऊन पडलेली आहे.

विवाह ठरविताना बारीकसारीक गोष्टींचे भान ठेवावे लागते. तिथे वधुवरांच्या पावित्र्याला, संस्काराला समाजमान्य नीतिनियमांना समोर ठेवून त्यानुसार रूढी-रिवाज-परंपरांना सामावून घेत वर्षोनुवर्षे या परंपरा, विधिसंस्कार सुरू आहेत. गुणी, नीतिमान, चारित्र्यसंपन्न, परोपकारी सहजीवन हे समाजाच्या उपयोगी पडते. त्यामुळे निकोप, निर्मळ समाजाची निर्मिती होण्यास मदत होते, असे लोकमानस मानत आलेले आहे. विवाह झाल्यानंतर एकमेकांचे नाते स्वतःशी आणि नातेवाइकांच्या सोबतीने विस्तारत जाते. व्यक्तिमनाला, कुटुंबाला समाजात महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. मुलं झाल्यानंतर तर त्याचे हे स्थान अधिकच पक्के बनते. ही सर्वांचीच धारणा होती. लग्न हा पवित्र संस्कारच मानला जायचा. मुलीला दान करायचे ही संकल्पना दृढ होती, त्यामुळे वधूकडील लोकांनी कन्येचा स्वीकार करायला हवा म्हणून द्रव्य देण्याची प्रथा सुरू झाली. त्यालाच कालांतराने ‘हुंडा’ असे म्हटले गेले. खरे तर त्यावेळी वधूचा पिता वराला आपली मुलगी दान करत असे म्हणून त्याला मनापासून वाटायचे की मुलीसाठी म्हणून काहीतरी द्यायचे. त्याला ‘हुंडा’ म्हणता येत नसे. कारण त्याने ते स्वखुशीने आपल्या मुलीसाठी दिलेले असायचे.

मध्ययुगीन कालखंडापर्यंत या गोष्टी सुरळीतपणे चालू होत्या. श्रीमंत घराणे, राजघराणे आपल्या मुलींना असे धन द्यायचे. तिथे मग मुलीच्या लग्नात पित्याने मुलीला शंभर गायी भेट दिलेल्या असत. द्रौपदी, सुभद्रा, उत्तरा यांसारख्या कन्यांनी सासरी जाताना स्वतःबरोबर घोडे, हत्ती, दागिने आंदण म्हणून नेले असल्याचे उल्लेख आढळतात. धनवान व्यक्ती मुलीच्या लग्नात जावयाला मौल्यवान दागिने देत असत. अर्थात तो हुंडा नव्हता तर ते मुलीवरच्या प्रेमापोटी होत असे. आपल्या परंपरेत लग्न हे पवित्र मानले गेले आहे, म्हणून हे असे देण्याघेण्याचे प्रकार वर्षोनुवर्षे चालत आले होते. मध्ययुगीन कालखंडात मात्र त्याला अतिशय विकृत स्वरूप प्राप्त झाले. लग्नात प्रत्यक्षात वर-वधूकडे असलेली उपजत संस्कारांची शिदोरी, स्वभावातील ऋजुता, कुटुंबात सर्वांना सांभाळून घेत जगण्याची हातोटी आणि चारित्र्यसंपन्नता हे सर्व कालांतराने कमी कमी होत गेले. मुलीचा पिता श्रीमंत असो वा गरीब- त्याला तिच्या लग्नात आयुष्यभराची साठविलेली पुंजी ही द्यावीच लागायची. लग्नात देण्या-घेण्याचे प्रकार एवढे रूढ झाले की हुंडा देण्याची प्रथा आणि या प्रथेने त्या मुलींचे, तिच्या वडिलांचे, कुटुंबाचे बळी घेतले आणि अक्षरशः कुटुंबाची कुटुंबे उद्ध्वस्त झाली.

हुंडाप्रथा ही समाजमनाला लागलेली कीड होती. एकेकाळी धनधान्याने भरलेले घर हे मुलीच्या वडिलांना मुलगी देण्यासाठी सुरक्षित वाटायचे. घरात धान्याच्या किती मुडी भरून रचून ठेवलेल्या आहेत? गोठ्यात किती जनावरे आहेत यावर त्या घराची श्रीमंती मोजून, अशा विश्वाला जगविणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी मुलगी देण्यासाठी वधू पिता आपली पायताणे झिजवायचा. तोच पिता पुढे हुंड्याच्या वाढत्या प्रथेने गलितगात्र झाला. मुलगी जन्माला येणे म्हणजे त्याला आपल्या गळ्याभोवती आवळलेला फास वाटू लागला. आणि अशी ही विचारधारा सर्वत्र फोफावली. हुंडा प्रथेवर कायद्याने बंदी आणली, मात्र ही कीड समाजाला आजही आतून पोखरून काढत आहे. आज तिचे स्वरूप बाह्य भपक्याने पैसा-प्रतिष्ठेची झूल पांघरून घेत पुढे जात आहे. गोव्यासारखे छोटे सुशिक्षित आणि आर्थिक जीवनस्तर उच्च असल्याचे मानले जाणारे राज्यही याला अपवाद नाही, याचीच खंत वाटते.

कार्तिक मासातील तुलसीविवाह उरकले की गोव्यात लग्नसराईचा मौसम सुरू होतो.
धूमधडाक्यात लग्ने पार पाडली जातात. प्रतिष्ठेपायी पैशांचा चुराडा केला जातो. पूर्वी आपल्या समाजात सलग पाच-पाच दिवस एक एक लग्नसमारंभ चालायचा. घरे पाहुण्यांनी भरून जात असत. शेजारी, वाड्यावरील लोक, नातेवाईक मिळून सगळी कामे करीत असत. मंडप घालणे, दिवा लावणे, माटो जेवण, हळदी समारंभ अशा विविध प्रसंगीची सगळी कामे सर्वजण मिळून करीत असत. लग्न वधूच्या घरी, नाहीतर गावातील एखाद्या घरी- प्रशस्त अंगणात लावले जायचे. शेती हा प्रधान व्यवसाय. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात मूबलक अन्नधान्य होते. जेवण रांधणारे तेवढ्याच मायेने वाढणारेही हात होते. लग्नघरात सजावट नैसर्गिक असायची. सभोवताली सहज उपलब्ध असलेले नैसर्गिक घटक जसे की, भेरली माड, चुडतांची विणून केलेली मल्ल, केळीचे थांबे, केळ्यांचे घड, आंब्याची पाने इत्यादींचा वापर सर्रास होत होता.

उपस्थितांना देण्यासाठी रंगीत कागदापासून तयार केलेली फुले, कागदापासून तयार केलेल्या जायांच्या लडी, इतर फुले, पाने असे सगळे घटक मिळून वातावरणात जिवंतपणा आणायचे. पैशांची देवाण-घेवाण जुजबीच होती. परंतु आनंद अपार होता. लग्नाच्या प्रत्येक विधीला परंपरेच्या बंधनात बांधण्याचा एक संस्कार होता. तो संस्कार लोकगीतांत गुंफून समूहापर्यंत पोहोचत होता. पतीपत्नीचे नाते हे संसारिक, कौटुंबिक, सामाजिक भान ठेवून सर्वांना बरोबर घेऊन कार्यरत राहायचे. आजकाल निदान गोव्यात तरी लग्न हा एक इव्हेंट म्हणून साजरा केला जात आहे का? लग्नाचे व्यावसायिकरण झालेले आहे का? की ती निव्वळ देवाणघेवाण आहे? असे वाटत राहावे अशीच सभोवतालची परिस्थिती आहे. ज्यांचा आर्थिक स्तर उच्च दर्जाचा आहे ते भरमसाठ खर्च करून उपस्थितांचे, नातेवाइकांचे लक्ष वेधून घेऊ शकतात; मात्र ज्यांची परिस्थिती बेताचीच आहे त्यांचे काय? मग कर्ज काढून तेही असाच लग्नसोहळ्याचा भपका करतात आणि त्यानंतर आयुष्यभर कर्ज फेडत तणावात जीवन जगतात. लग्न संकल्पना ही काही स्पर्धा नाही की तो शुद्ध व्यवहारही नाही. गाजावाजा करून केलेले लग्न, एकमेकांना दिलेली वचने, सर्वांसमक्ष घातलेले जीवनभराचे सात फेरे, या सर्व गोष्टी निव्वळ नाटकी ठराव्यात अशी सध्याची गोव्याची स्थिती आहे असे वाटते. अलीकडे प्री-वेडिंग शूटिंग नावाचा प्रकार बराच वाढलेला आहे. पूर्वी स्त्रियांना सार्वजनिक जीवनात कमीच स्थान प्राप्त होत होते. सासरी तर ती नवऱ्याशी सर्वांसमक्ष बोलूही शकत नव्हती. सासू तर खाष्ट असायची. नणंदेशी तर बोलायची सोयच नव्हती. अशावेळी तिच्याजवळ तिच्या गरजेच्या वस्तू असणे ही नववधूची खास गरज होती. त्यासाठी माहेरहून तिला काजळ, कुंकू, फणी, आरसा असलेले लाकडी पेटुल, घागर-कळशी, विळी व इतर अशा संसारोपयोगी वस्तू देण्याची परंपरा सुरू झाली. प्रवाह बदलत राहिला. पुढे मग या वस्तूंचे रूपांतर हुंड्यात झाले. कायद्याने हुंडा बंद झाला, मात्र विविध महागड्या वस्तूंमधून आता या परंपरेने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. या छोट्याशा प्रदेशात घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले आहे. कुटुंबव्यवस्था विस्कळीत झाली आहे. मुलांच्या समस्या वाढल्या आहेत. वृधत्व नकोसे होऊ लागले आहे. जी व्यक्ती आयुष्यभराची साथीदार होणार आहे, त्या व्यक्तीशी हृदयाची तार जुळली पाहिजे. एकमेकांना उन्नत करीत जाण्याची, सन्मान देण्याची वृत्ती असली तरच संसार सुखाचा होतो. नात्यांचे बंध जुळविताना सरकारी नोकरी, बंगला, गाडी, दागदागिने, बँक बॅलन्स आणि फक्त आपण दोघे व आपली मुलं असाच विचार असेल तर संसार कसा खुलेल? स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे बेताल वागणे नव्हे. भिन्नलिंगी दोन स्वतंत्र व्यक्तिमत्त्वे जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांचाच संसार असतो असे नाही.