विलिस प्लाझाची चर्चिलला सोडचिठ्ठी

0
117

द्वितीय विभागातील क्लब मोहम्मदान स्पोर्टिंग क्लबने काल बुधवारी ईस्ट बंगालचा माजी आघाडीपटू विलिस प्लाझा याला आगामी आय लीग मोसमासाठी करारबद्ध केले. चर्चिल ब्रदर्सकडे मोर्चा वळवण्यापूर्वी ३३ वर्षीय प्लाझा याने २०१६-१७ मोसमात ईस्ट बंगालकडून आपल्या मोहिमेची सुरुवात केली होती. त्रिनिदाद अँड टोबेगोचा विलिस हा ‘ब्लॅक अँड व्हाईट ब्रिगेड’चा यंदाच्या मोसमात करारबद्ध केलेला दुसरा खेळाडू आहे.

क्लबचे सचिन दिपेंदू बिस्वास यांनी विलिस याच्याबद्दल बोलताना सांगितले की, त्याची गोल नोंदविण्याची क्षमता अचाट आहे. त्याचा मागील रेकॉर्ड त्याच्याविषयी खूप काही सांगून जातो. त्याच्या आक्रमक खेळामुळे आम्ही प्रभावित झालो आहोत. गोल नोंदविण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘असिस्ट’च्या बाबतीतही तो कमी नाही त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.

२०१८ साली ईस्ट बंगालने मुक्त केल्यानंतर विलिस याने मोहम्मदान स्पोर्टिंगसोबत बोलणी केली होती. परंतु, त्यावेळी काही कारणास्तव त्यांनी विलिस याला आपल्या संघात घेतले नव्हते. ‘मोहम्मदानसाठी खेळण्यास मी सज्ज झालो आहे. आघाडीचे खेळाडू व प्रेरणादायी चाहत्यांच्या जोरावर क्लबला प्रथम विभागासाठी पात्र ठरवण्याचा प्रयत्न असेल, असे प्लाझा याने सांगितले आहे.