विर्नोड्यातील अपघातात वाहनचालक ठार

0
22

शेकडो कोंबड्याही पावल्या मृत; फरार ट्रकचालकास अटक

विर्नोडा-पेडणे येथे राष्ट्रीय महामार्ग 66 वर भीषण अपघात होऊन एक जण ठार होण्याची घटना काल पहाटे सव्वाचारच्या दरम्यान घडली. बोलेरो पिकअप टेम्पो आणि ट्रक यांच्यात हा अपघात घडला. त्यात बोलेरो टेम्पोचालक ठार झाला. याशिवाय ट्रकच्या धडकेने शेकडो कोंबड्याही मृत पावल्या. अपघातानंतर ट्रकचालकाने पलायन केले; मात्र त्याला धारगळ येथे पकडण्यात पोलिसांना यश आले.

सविस्तर माहितीनुसार, पेडणे तालुक्यातील विर्नोडा येथे राष्ट्रीय महामार्ग 66 वर सोमवारी पहाटे कोंबडी घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप टेम्पो (क्र. जीए-06-टी-9286) हा म्हापशाच्या दिशेने जात होता, त्याच दिशेने ट्रक (क्र. एमएच-08-एपी-6543) हाही जात होता. विर्नोडा येथील संत सोहिरोबानाथ अंबिये शासकीय महाविद्यालयासमोर ट्रकने बोलेरोना मागून जोरदार धडक दिली. त्या धडकेबरोबर बोलेरो वाहनाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या धडकेत बोलेरोचा चालक नियाझ झारी (30) हा जागीच ठार झाला, तर अन्य दोन युवक जखमी झाले. याशिवाय वाहनातील शेकडो कोंबड्याही मृत पावल्या. अपघात होताच ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून धारगळ येथे त्याला पकडण्यात यश मिळवले. मुत्तपा कोलकर (रा. बिजापूर) या ट्रकचालकाविरुद्ध पेडणे पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पंचनामा करण्यात आला. नियाझ झारी याचा मृतदेह बांबोळीतील गोमेकॉत शवचिकित्सेसाठी पाठवण्यात आला आहे.

बांबोळीत धावत्या जीपला अचानक आग

बांबोळी येथे गोमेकॉजवळ महामार्गावर एका धावत्या सुमो जीपगाडीला काल सायंकाळी आग लागली. जीपचालक आणि जीपमधील प्रवासी वेळीच वाहनातून खाली उतरल्याने अनर्थ टळला. या आगीमध्ये वाहनाचे मोठे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय आहे. या आगीमुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविण्याचे काम केले.