विरोधी पक्षांच्या 14 खासदारांचे निलंबन

0
20

>> नव्या संसद भवनाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून घातला गोंधळ; हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन कायम राहणार

लोकसभेच्या मुख्य सभागृहात दोन घुसखोरांनी धुराच्या नळकांड्या फोडल्यामुळे नव्या संसद भवनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या खासदारांनी काल संसदेत जोरदार हंगामा केल्यानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. असभ्य वर्तन केल्याप्रकरणी 14 खासदारांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. त्यात लोकसभेतील 13 आणि राज्यसभेतील एका खासदाराचा समावेश आहे. हे निलंबन संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत कायम राहणार आहे. दुसऱ्या बाजूला संसद सचिवालयाने कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी 8 सुरक्षा कर्मचाऱ्यांना काल निलंबित केले. दरम्यान, संसदेत घुसखोरी करणाऱ्या दोघांना आणि संसदेबाहेर आंदोलन करणाऱ्या दोघांना अशा एकूण चार जणांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या नवव्या दिवशी गुरुवारी कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या सुरक्षेबाबत गोंधळ घातला. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दिवसभरात अनेकवेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.

अध्यक्ष ओम बिर्ला हे काल लोकसभेत पोहोचताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या सुरक्षेबाबत गदारोळ सुरू केला. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी 5 खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला होता. सुरूवातीला काँग्रेस खासदार टी. एन. प्रतापन, हिबी इडन, एस. जोथिमनी, राम्या हरिदास आणि डीन कुरियाकोस यांचे हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबन करण्यात आले होते. त्यानंतरही गदारोळ थांबला नसल्याने आणखी 9 खासदारांना निलंबित केले गेले. त्यात बेनी बेहानन, मोहम्मद जावे, पी. आर. नटराजन, कनिमोझी, व्ही. के. श्रीकंदन, के सुब्रमण्यम, एस. वेंकटेशन आणि मणिकम टागोर यांचा समावेश आहे. निलंबित खासदारांमध्ये काँग्रेसचे 9, माकपचे 2, डीएमके आणि सीपीआयच्या प्रत्येकी एका नेत्याला लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे.

लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही विरोधी पक्षांनी गदारोळ केला. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन सभागृहाच्या वेलमध्ये आले. यावर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला. त्यानंतर डेरेक ओब्रायन यांनाही निलंबित करण्यात आले.

एका खासदाराचे निलंबन मागे
संसद सुरक्षेच्या मुद्द्यावरून सभागृहात गोंधळ केल्याप्रकरणी लोकसभेतील 14 खासदारांचे निलंबन केल्याची घोषणा दुपारी करण्यात आली होती. त्यापैकी एका खासदाराचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. एकूण निलंबित खासदारांची संख्या आता 13 आहे. डीएमडीके पक्षाचे खासदार एस. आर. पार्थिबन यांचे निलंबन नजरचुकीने झाल्याचे लक्षात आल्याने लोकसभा सचिवालयाकडून निलंबित खासदारांच्या यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले आहे. एस. आर. पार्थिबन हे लोकसभेच्या गोंधळावेळी सदनात उपस्थित नसल्याचे नंतर स्पष्ट झाले.

घुसखोरीनंतर सुरक्षा नियमांत बदल
खासदार, कर्मचारी आणि पत्रकारांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असतील. चौथ्या गेटमधून अभ्यागतांना प्रवेश दिला जाईल.
लोकसभेतील दोघा तरुणांच्या घुसखोरीच्या प्रकरणानंतर अभ्यागत पास जारी करणे सध्या थांबवण्यात आले आहे.
प्रेक्षक गॅलरीच्या आजूबाजूला काचेचे तावदान बसवले जाईल, जेणेकरून कोणीही उडी मारून सभागृहात प्रवेश करू शकणार नाही.
विमानतळांप्रमाणे तपासणीसाठी बॉडी स्कॅन मशीन्स बसवण्यात येतील.
संसद परिसरात सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवली जाईल.

निलंबित खासदारांची नावे
– टी. एन. प्रथापन, काँग्रेस
– हीबी इडन, काँगेस
– एस. जोथिमनी, काँग्रेस
– राम्या हरिदास , काँग्रेस
– डीन कुरियाकोस, काँगेस
– मणिकम टागोर, काँग्रेस
– बेनी बेहनन, काँग्रेस
– व्ही. के. श्रीकंदन, काँग्रेस
– मोहम्मद जावेद, काँग्रेस
– पी. आर. नटराजन, माकप
– एस. वेंकटेशन, माकप
– कनिमोई करुणानिधि, द्रमुक
– के. सुब्रमण्यन, सीपीआय
– डेरेक ओब्रायान, तृणमूल

चौघांना सात दिवसांची पोलीस कोठडी

>>लोकसभेत घुसखोरी प्रकरण; मुख्य सूत्रधार अजूनही फरार

लोकसभेत घुसखोरी करत धुराच्या नळकांड्या फोडणाऱ्या सागर शर्मा, मनोरंजन गौडा आणि संसदेबाहेर आंदोलन करणाऱ्या नीलम देवी, अमोल शिंदे या चार जणांना सखोल चौकशीसाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. काल या चौघांना दिल्लीतील न्यायालयात हजर केले असता त्यांना ही कोठडी सुनावण्यात आली. या चौघांविरुद्ध दहशतवादविरोधी कायदा यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ललित झा नामक व्यक्ती मुख्य सूत्रधार असून, तो अद्यापही फरार आहे.

बुधवारी लोकसभेचे कामकाज सुरू असताना अचानक दोन जण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उतरले. मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावू लागले. त्यानंतर संसदेत नळकांड्या फोडून पिवळा धूर सोडला. लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या तरुणांना काही खासदारांनीच पकडले. या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षा यंत्रणेवर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. धक्कादायक बाब म्हणजे खासदाराच्या प्रताप सिम्हा यांच्या पासवर हे दोन्ही तरुण सभागृहात शिरले होते. खासदार प्रताप सिम्हा हे भाजपचे नेते आहेत. त्यांच्याच शिफारसीवर आरोपींचा पास तयार करण्यात आला होता. त्यामुळे या अनुषंगानेही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

लोकसभेत घुसखोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चारही संशयिताना दिल्ली न्यायालयात काल हजर करण्यात आले. लोकसभेत पिवळा धूर पसरवताना पकडले गेलेले सागर शर्मा आणि मनोरंजन गौडा आणि संसदेबाहेर घोषणाबाजी करताना अटक केलेल्या नीलम देवी आणि अमोल शिंदे यांची सविस्तर चौकशीसाठी 15 दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे, अशी मागणी दिल्ली पोलिसांनी केली. दिल्ली पोलिसांनी एनआयए प्रकरणांसाठी विशेष न्यायाधीश हरदीप कौर यांच्यासमोर त्यांना हजर केले होते, त्यांनी 15 दिवसांच्या कोठडीत चौकशीची मागणी केली होती.

संशयित कुठल्या राज्यातील?
सागर शर्मा हा उत्तरप्रदेशच्या लखनऊमधील आरामबागेत राहणारा आहे.
मनोरंजन गौडा हा कर्नाटकच्या मैसूरमधील रहिवासी आहे.
नीलम देवी ही हरियाणाच्या हिस्सार जिल्ह्यातल्या घोसी कला या गावातील रहिवासी आहे.
अमोल शिंदे हा महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील झरी बुद्रुक गावचा रहिवासी आहे.

मुख्य सूत्रधार ललित झा फरार
या प्रकरणाचा मास्टरमाईंड ललित झा हा अद्यापही फरार आहे. ललित झाकडे सगळ्या संशयितांचे मोबाईल आहेत. तो फरार झाला आहे. या प्रकरणाचा मास्टमाईंड तोच आहे असा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी ज्या आरोपींना अटक केली आहे त्यांच्या चौकशीत, 13 डिसेंबरला हा गोंधळ घालायचा हे ललित झाने त्यांना सांगितले होते, असे समोर आले आहे. चारही आरोपींनी ललितचे नाव घेतले आहे. तो सगळ्या आरोपींच्या संपर्कात होता. त्याने चारही आरोपींचे फोन ताब्यात घेतले होते आणि तो व्हिडीओ अपलोड झाल्यावर तिथून फरार झाला होता. ललितचे शेवटचे लोकेशन राजस्थानातील नीमराणा होते; मात्र अजूनही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.