सांताक्रूझ मतदारसंघाचे आमदार आंतोनियो उर्फ टोनी फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखालील सांताक्रुझमधील ग्रामस्थांच्या एका शिष्टमंडळाने काल विरोधी पक्ष नेते चंद्रकांत कवळेकर यांची सचिवालयात भेट घेऊन ग्रेटर पणजी पीडीएतून सांताक्रुझला वगळण्यात यावे ही ग्रामस्थांची जी मागणी आहे ती विधानसभा अधिवेशनात मांडावी, अशी मागणी करणारे एक निवेदन काल त्यांना सादर केले. सांताक्रुझ मतदारसंघाचा ग्रेटर पणजी पीडीए समावेश करण्यात आला तर सांताक्रुझचा विद्ध्वंस होणार असल्याची भीती ग्रामस्थांनी ह्या निवेदनातून मांडली आहे. सांताक्रुझमधील बोंडवल तळ्यासह पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या भागाचा ‘नो डेव्हलपमेंट झोन’मध्ये समावेश करण्यात येणार असल्याचे नगर आणि नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई हे सांगतात पण टीसीपी कायद्यातच तशी तरतूद आहे असे ग्रामस्थानी कवळेकर यांच्या नजरेत आणून दिले व सांताक्रुझचा पीडीएत समावेश करण्यास आमचा तीव्र विरोध आहे असे यावेळी स्पष्ट केले. आमदार टोनी फर्नांडिस यावेळी म्हणाले की मागणी मान्य झाली नाही तर आपण ग्रेटर पणजी पीडीए समितीतून राजीनामा देईन. याप्रश्नी आपण राज्यातील लोकांबरोबर असून शेवटपर्यंत त्यांच्याबरोबरच राहणार असल्याचे ते म्हणाले.