विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची दिल्लीतील बैठक रद्द

0
4

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवार दि. 6 डिसेंबरला दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची बैठक बोलावली होती; पण ही बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे या बैठकीला विविध कारणांस्तव उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही बैठक 18 किंवा 19 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी नवी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होणार होती. काँग्रेसने ही बैठक बोलावली होती, त्यात विरोधी पक्षांचे बडे नेते सहभागी होणार होते. मात्र आता अनेक नेते उपस्थित न राहिल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.

काँग्रेस नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एम. के स्टॅलिन तमिळनाडूत आलेल्या मिचौंग चक्रीवादळामुळे हजर राहू शकणार नव्हते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती ठीक नाही. तसेच, ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांनी नियोजित कार्यक्रमांमुळे उपस्थित राहू शकणार नव्हते. त्यामुळे बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीस तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आल्यानंतर उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. मात्र ममता बॅनर्जी यांनी बैठकीला उपस्थित न राहण्याचे कारण स्पष्ट केले आहे. उत्तरेकडील भागात आधीच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी ममता बॅनर्जींना उपस्थित रहावे लागणार आहे. तसेच इंडिया आघाडीच्या बैठकीबद्दल त्यांना आधी माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे या काळात त्या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत, असे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. इंडिया आघाडीतील मित्रपक्षांशी चर्चा करून बैठकीचे आयोजन करण्याचा काँग्रेस पुन्हा प्रयत्न करणार आहे.