मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 24 ते 26 मार्च दरम्यान होणाऱ्या तीन दिवसीय राज्य विधानसभेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची रणनीती निश्चित करण्यासाठी सर्व विरोधी आमदारांची बैठक येत्या गुरुवार किंवा शुक्रवारी घेतली जाणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी गटाला घेरण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. सर्व विरोधी आमदारांची संयुक्त बैठक घेऊन रणनीतीवर विचारविनिमय केले जाणार आहे. सत्ताधारी गट विरोधी आमदारांना प्रश्न विचारण्यापासून रोखण्यासाठी रणनीती तयार करीत आहे. तथापि, विरोधी पक्षाचे आमदार त्यांची रणनीती यशस्वी होऊ देणार नाहीत, असेही विरोधी पक्षनेते आलेमाव यांनी सांगितले.