विरुद्ध आहार

0
49
  • डॉ. मनाली म. पवार

सर्वसाधारणपणे सगळेच हल्ली आले- पुदिना चहा पितात. दुधामध्ये आले किंवा पुदिना मिसळू नये. हा विरुद्धाहार होतो. म्हणून चहा बनवताना सुंठीचा वापर करावा किंवा दुधाचा चहा न बनवता पाण्यामध्ये उकळून नुसत्या काळ्या चहाचे पान करावे.

विरुद्ध आहाराची यादी पाहिल्यावर बर्‍याच जणांना प्रश्‍न पडला, मग खावे करी काय?… अगदी आले-पुदिना चहापासून ते बिर्याणीपर्यंत सगळाच विरुद्ध आहार! हा असा विरुद्ध आहार कसा व कोणी खावा…?
सद्य काळातील काही विरुद्ध आहाराची उदाहरणे म्हणजे

  • फ्रूट सॅलॅड व मिल्क शेक ः- या दोन्ही प्रकारात दुधाबरोबर विविध फळे मिश्रित करून हे पदार्थ बनवले जातात. दूध हे मधुर गुणाचे. फळामध्येही बर्‍याच प्रमाणात मधुर रस असतो. पण त्याचबरोबर आंबट रसही असतो. त्यामुळे अम्लरसात्मक फळे मधुर दुधाबरोबर विरुद्धाहार ठरतात. मग पिढ्यान् पिढ्या आपण जे मामीच्या हातचे केळ्याचे शिकरण खात आहोत त्याचे काय?? असा प्रश्‍न सगळ्यांनाच पडला असेल! म्हणूनच तर शिकरणामध्ये गोड केळी, वेलची व साजूक तूपही घालायचे असते. फ्रूट सॅलॅड, मिल्क शेक हे बहुतांश लोकांचे आवडीचे पदार्थ. महिला तर उपवासाच्या दिवशी फळे व दूध उपवासावर बरे म्हणून या पदार्थांचे सेवन करतात. परिणामी पित्त वाढते. अजीर्णाचा त्रास होतो. डोकेदुखी व त्वचारोगासारखे आजार होतात. म्हणून फळे खावीत, फळांचा रस सेवन करावा. दूध चांगले उकळून कोमट करून प्यावे पण एकत्र मिश्रण करून सेवन करू नये.
  • आईसक्रीम विथ हॉट चॉकलेट, फ्राइड आइसक्रीम किंवा सिझलिंग ब्राउनी इत्यादी.
  • हे पदार्थ तर लहान- थोरांचे अगदी आवडीचे पदार्थ आहेत. आईसक्रीम खात होतात तेवढ्यापर्यंत ठीक होतं. आता हे फ्राइड आईसक्रीम?- काय प्रकार आहे?
    आइसक्रीम हा मुळातच अगदी थंड पदार्थ. त्यावर आपण उष्ण पदार्थ टाकतो किंवा उष्ण प्रक्रिया करतो व सेवन करतो. हाही विरुद्ध पदार्थच आहे. म्हणून याचे सेवन करू नये. चॉकलेट वेगळ्या वेळी वेगळे खावे. आइसक्रीम वेगळ्या वेळी खावे.
  • पास्ता ः- हाही पदार्थ सगळ्यांच्या आहारातील विशेष घटक बनला आहे. किंवा पूर्ण जेवण म्हटले तरी अतिशयोक्ती वाटणार नाही. पास्ता किंवा व्हाइट सॉस पास्ता यामध्ये दूध, लसुण व इतर मसाल्याचे पदार्थ घातले जातात. हा पदार्थ वीर्यविरुद्ध आहार ठरतो कारण दूध हे शीत वीर्यात्मक व लसूण व इतर मसाले हे उष्ण वीर्यात्मक आहेत. म्हणूनच आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये या पदार्थाचे वर्णन नाही.
  • हनी ग्लेझ्ड चिकन – हा पदार्थ चिकन तळून वर चकाकी येण्यासाठी त्यावर गरम केलेले मध घातले जाते व सजावटीसाठी तीळ. मुळातच मांस हे तळून खाऊ नये. ते चांगले शिजवून खावे. त्यात महत्त्वाचे म्हणजे मध कधीच गरम करू नये. म्हणून तर गरम पाण्यात मध हा विरुद्धाहार सांगितलाय. तसेच मांसाबरोबर तीळ सेवन हेही वर्ज्य सांगितले आहे. मग असा हा विरुद्धाहार फक्त जिभेलाच छान लागतो. पोटात गेल्यावर मात्र मोठी गडबड करतो.
  • दुधाची खीर व दह्याची कढी – सण-समारंभामध्ये बर्‍याच वेळा आपण खीर बनवतो व दह्याची कढीही बनवतो. दुधापासूनच जरी हे दोही पदार्थ बनलेले असले तरी या दोहोंचे गुण मात्र वेगळे आहेत. म्हणून अशा प्रकारच्या जेवणात खीर बनवायची असल्यास कढी बनवू नये व कढी बनवायची असल्यास खीर बनवू नये.
  • ग्रेव्ही – पंजाबी बरेचसे पदार्थ बनवताना ग्रेव्हीचा वापर करतात. यामध्ये लसूण, टोमॅटो, कांदा, मीठ, तेल, काजू व वरून दूध किंवा फ्रेश मिल्क क्रीम घालतो. म्हणजेच हे दूध किंवा दुधाची साय कांदा-लसूण-टोमॅटो व मीठाबरोबर मिसळल्याने विरुद्धाहार बनतो.
  • जिलबी व रबडी – शाही जेवणामध्ये जिलबी, रबडीसारखे पदार्थ एकत्र खाल्ले जातात. जिलबी ही फर्मेंट करून बनवल्याने अम्लरसात्मक व रबडी मधुर रसात्मक म्हणून विरुद्धाहार. म्हणून हे दोन्ही पदार्थ एकत्र न खाता स्वतंत्र खावेत.
  • हैद्राबादी कांद्याची खीर – दुधामध्ये कांदे शिजवून ही खीर बनवली जाते. यामध्ये दूध शीत वीर्यात्मक व कांदा हा उष्ण वीर्यात्मक होय.
  • आले- पुदीना चहा – नये. कारण दुधामध्ये हरित भाजी मिसळू नये असे ग्रंथकार सांगतात. सर्वसाधारणपणे सगळेच हल्ली असा चहा पितात. दुधामध्ये आले किंवा पुदिना मिसळू चहा बनवताना सुंठीचा वापर करावा किंवा दुधाचा चहा न बनवता पाण्यामध्ये उकळून नुसत्या काळ्या चहाचे पान करावे.
  • दहीभात – बर्‍याच वेळा दही-भाताचे सेवन केले जाते. त्यामध्ये दूधही घातले जाते. त्यामुळे हा विरुद्ध आहार होतो.
    विरुद्धाहाराची आणखी काही उदाहरणे –
  • भरभर जेवणे किंवा अगदी सावकाश जेवणे
  • स्वच्छ जागेवर बसून न खाणे.
  • जेवताना किंवा जेवल्यावर किंवा जेवायच्या अगोदर भरपूर पाणी पिणे
  • खूप थंड, फ्रीजमधील पाणी गरम जेवणाबरोबर पिणे
  • फ्रीजमधून पदार्थ बाहेर काढून तसेच सेवन करणे.
  • मायक्रोव्हेवमध्ये जेवण बनवणे.
  • प्लॅस्टिक प्लेटमध्ये गरम जेवण जेवणे. प्लॅस्टिक कपमध्ये गरम चहा, पाणी पिणे.
  • जेवताना शांती नसणे. मनात घालमेल, भीती, काळजी असे विचार चालू असणे
  • भूक नसताना जेवणे, अजीर्ण असताना जेवणे
  • जेवल्यानंतर गोड पदार्थ खाणे हाही विरुद्धाहार आहे.
  • जेवल्यानंतर लगेच व्यायाम करणे.
  • जेवणानंतर आइसक्रीम किंवा जेवणानंतर भरपूर ताक पिणे.
    एवढे सगळे नियम व विरुद्धाहाराची सुची असतानासुद्धा विरुद्ध आहार कोण सेवन करू शकतो?… ज्यांना विरुद्ध आहार सात्म्य आहे… त्याने सेवन करावे. पण तेही प्रमाणातच.
  • ज्यांचा जाठराग्नी प्रदीप्त असेल.
  • युवावस्था
  • नित्य योग्य मात्रेत स्निग्ध द्रव्याचे सेवन करणारे.
  • नित्य व्यायाम करणारे
  • बलवान.
    चिकित्सा –
    प्रथम वाढलेले दोष शोधनोपक्रमाने शरीराबाहेर काढावे. त्यासाठी विरेचन, वमन यांसारखे पंचकर्म करावे.
  • काही शमन औषधांचा प्रयोग करणे.
  • हितकर आहाराचे सेवन करणे
  • अपथ्यकर आहाराचा त्याग करावा, तोही हळुहळू. म्हणजे प्रथम चतुर्थांश अपथ्य द्रव्याचा त्याग करावा व हळूहळू पूर्ण.
  • वंध्यत्व, नपुंसकता यांसारख्या आजाराचे जे वाढते प्रमाण सध्या आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे प्रत्येकाने यावर नक्की विचार करावा.