विरियातो यांच्यावरील आरोप खोटा : शिवसेना

0
14

काँग्रेस पक्षाचे दक्षिण गोव्यासाठीचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी भारतीय राज्यघटनेचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप हा खोटा आहे, असे इंडिया आघाडीतील एक घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते (ठाकरे गट) जितेश कामत यांनी स्पष्ट केले. भाजप हा राजकीय नेत्यांचे चारित्र्यहनन करण्याच्या कामी हुशार आहे. या पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे मोठ्या प्रमाणात चारित्र्यहनन केले असल्याचा आरोपही कामत यांनी यावेळी केला.
नेहरू व गांधी यांचे चारित्र्यहनन करीत पंतप्रधान बनलेल्या मोदी यांना आता मात्र पंतप्रधान बनल्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना नमन करावे लागत असल्याचे कामत म्हणाले.
विरियातो फर्नांडिस यांनी भारतीय राज्यघटनेवर टीका केलेली नाही किंवा अपमानही केलेला नाही. गोव्याला भारतीय स्वातंत्र्यानंतर पोर्तुगीज राजवटीपासून मुक्ती मिळण्यास विलंब झाल्याने गोमंतकीयांना हव्या होत्या अशा काही गोष्टींचा राज्यघटनेत समावेश होऊ शकला नाही. त्यामुळे राज्यघटना गोमंतकीयांवर लादली गेली अशी काही गोमंतकीयांची भावना झाल्याचे त्यांचे म्हणणे होते, असे कामत म्हणाले.