टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला सीएट सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटर पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारावर कोहलीने तिसर्यांदा नाव कोरले. विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने हा पुरस्कार स्वीकारला. यापूर्वी कोहलीने २०११-१२ आणि २०१३-१४ मध्येही हा पुरस्कार पटकावला होता.
भारताचे माजी यष्टिरक्षक-फलंदाज फारुख इंजिनीयर यांना सीएट क्रिकेट रेटिंग्जच्या पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि सीएटचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांच्या हस्ते इंजिनीयर यांना गौरवण्यात आले. शिखर धवनला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फलंदाज, तर न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टला सर्वोत्तम आंतररष्ट्रीय गोलंदाज पुरस्काराचा मान देण्यात आला. अफगाणिस्तानचा युवा लेगस्पिनर राशिद खानला टी- ट्वेन्टी क्रिकेटमधल्या सर्वोत्तम गोलंदाजांचा किताब देण्यात आला. तर वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला ‘पॉप्युलर चॉईस अवॉर्ड’ हा पुरस्कार मिळाला. न्यूझीलंडचा कॉलिन मन्रो सर्वोत्तम टी २० फलंदाज ठरला.तर भारताच्या अंडर १९ संघाचा क्रिकेटपटू शुभमन गिलला सर्वोत्तम अंडर १९ खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. देशांतर्गत क्रिकेटसाठी अनुक्रमे मयंक अगरवाल व हरमनप्रीत कौर यांची निवड झाली.