विराटचे अव्वलस्थान भक्कम

0
61

ीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीतील आपले पहिले स्थान अधिक भक्कम केले आहे. न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेत १०४ धावा जमविलेल्या विराटने या कामगिरीच्या बळावर १३ गुण आपल्या खात्यात जमा करताना दुसर्‍या स्थानावरील ऍरोन फिंचवरील आघाडी ४० गुणांपर्यंत वाढवली आहे. किवीजविरुद्धच्या मालिकेनंतर विराटच्या खात्यात ८२४ गुण जमा आहेत. विराट व्यतिरिक्त रोहित शर्मा ( + ३, २१वे स्थान) व शिखर धवन (+ २०, ४५वे स्थान) यांनी सकारात्मक दिशेने वाटचाल केली आहे.

भारतीय गोलंदाजांचा विचार केल्यास भुवनेश्‍वर कुमारने दोन स्थानांची सुधारणा करत २६व्या क्रमांकावर हक्क सांगितला आहे. लेगस्पिनर युजवेंद्र चहल व डावखुरा संथगती गोलंदाज अक्षर पटेलने अनुक्रमे २२ व १७ स्थानांची मोठी प्रगती साधताना तिसावा व ६२वा क्रमांक आपल्या नावे केला आहे.

न्यूझीलंडच्या खेळाडूंनी देखील ताज्या क्रमवारीत बर्‍यापैकी मजल मारली आहे. लेगस्पिनर ईश सोधी याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम दहावे स्थान मिळवताना पाच क्रमांकांची मोठी उडी मारली आहे. डावखुरा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्ट याला मालिकेत सहा बळी घेतल्याचा लाभ झाला आहे. त्याने तिसाव्या क्रमांकावरून थेट सोळावे स्थान गाठले आहे. किवीज संघाचा स्फोटक सलामीवीर कॉलिन मन्रोने राजकोटमधील १०९ धावांच्या बळावर चार क्रमांकांनी वर सरकताना १२वे स्थान मिळविले आहे.

सांघिक क्रमवारीचा विचार करता न्यूझीलंडला पाच गुणांचा तोटा झाला आहे. त्यामुळे त्यांची दुसर्‍या स्थानी घसरण झाली आहे. १२४ गुणांसह पाकिस्तानने पहिले स्थान मिळविले आहे. न्यूझीलंड व विंडीज संघाचे समान १२० गुण असले तरी दशांश फरकाने न्यूझीलंडने आपला दुसरा क्रमांक राखला आहे. तीन गुणांच्या कमाईसह भारताने आपली गुणसंख्या ११९ केली असली तरी भारताच्या पाचव्या स्थानात कोणताही बदल झालेला नाही.