>> कझाकिस्तानच्या अक्ताऊ शहरातील घटना; भीषण दुर्घटनेतून 25 जण बचावले
कझाकिस्तानच्या अक्ताऊ या ठिकाणी काल सकाळी विमान कोसळून मोठा अपघात झाला. अजरबैजानन एअरलाईन्सचे हे विमान होते. समुद्र किनाऱ्याच्या जवळ हे विमान कोसळले. या विमानातून 62 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर्स प्रवास करत होते. त्यातील 42 प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. या घटनेतून 25 जणांना वाचवण्यात यश आले आहे. जखमी 22 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये दोन मुलांचा समावेश असून, त्यांची प्रकृती चिंताजनक
आहे.
अजरबैजान एअरलाईन्सने दिलेल्या माहितीनुसार, ज्या विमानाचा अपघात झाला त्याचा क्रमांक जे2-8243 असा होता. हे विमान अझरबैजानहून रशियाच्या चेचन्या प्रांताची राजधानी ग्रोझनीकडे जात होते. पण त्याला कझाकिस्तानच्या अक्ताऊ शहरापासून 3 किमी अंतरावर असताना विमानात तांत्रिक बिघाड जाल्यानंतर वैमानिकाने इमर्जन्सी लँडिंगसाठी सूचना केली होती; मात्र त्यापूर्वीच हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. विमानाचा अपघात झाल्यानंतर सदर ठिकाणी 52 फायरफायटर्स आणि 11 बचावपथके तैनात करण्यात आली, त्यांच्याकडून मदत आणि बचावकार्य राबवण्यात आले.
रशियन वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अजरबैजान एयरलाईन्सच्या या विमानाने रशियाच्या चेचन्या येथील बाकूमधून ग्रोज्नीसाठी उड्डाण केले होते. ग्रोज्नीमध्ये धुके पडल्याने या विमानाने प्रवासी मार्ग बदलला होता. विमान धावपट्टीच्या अगदी जवळ होते. त्याचवेळी कोणीतरी त्याचा व्हिडिओ शूट करत होते. हे विमान उतरत असताना अचानक थेट जमिनीकडे येताना या व्हिडिओत दिसते आहे.
हे विमान इतके तिरके झाले की ते जमिनीवर आदळेल असेच वाटते आणि तसेच घडलेही. धावपट्टीवर येण्यापूर्वीच हे विमान जमिनीवर आदळले आणि त्यावेळी मोठा आवाज व स्फोट झाला. त्यानंतर आगीने विमानाला वेढले. मोठ्या आवाजात विमानातील प्रवासी किंचाळत असल्याचे व्हायरल व्हिडिओतून ऐकू येत आहे. अपघातानंतर विमानाचे दोन तुकडे झाले. त्यामधून काही जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींना रुग्णवाहिकांमधून रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात
आले.