>> विमानतळाला मनोहर पर्रीकरांचे पूर्ण नाव देणे अपेक्षित : कार्लूस फेरेरा
मोप येथील आंतराष्ट्रीय विमानतळाचे ‘मनोहर’ असे नामकरण करून भाजप सरकारने एकप्रकारे मनोहर पर्रीकर यांचा अपमानच केला असल्याची टीका काल कॉंग्रेसने केली. काल पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचे आमदार कार्लूस फेरेरा यांनी या ‘अपूर्ण’ नावावरून भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. ‘मनोहर’ ह्या नावाच्या कित्येक व्यक्ती गोव्यात असून, केवळ मनोहर हे नाव विमानतळाला देणे हे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
या पत्रकार परिषदेला गोवा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व कॉंग्रेस नेते श्रीनिवास खलप उपस्थित होते.
गोव्यातील भाजप सरकार आपले एकेकाळचे लोकप्रिय व लाडके नेते मनोहर पर्रीकर यांचा वारसा कधीच विसरले आहे. आणि आता त्यांनी मोप विमानतळाला पर्रीकरांचे नाव दिल्याचा केवळ दिखावा केला असल्याचे फेरेरा म्हणाले. भाजपला जर खरोखरच आपल्या लाडक्या नेत्याचे नाव विमानतळाला द्यायचे होते, तर त्यांच्या सरकारने सन्मानाने त्यांचे पूर्ण नाव म्हणजेच मनोहर पर्रीकर असे नाव विमानतळाला द्यायला हवे होते, असे फेरेरा यांनी स्पष्ट केले.
अमित पाटकर हे याविषयी बोलताना म्हणाले की, भाजप हा पक्ष आपल्या नेत्यांचा हवा तसा वापर करून नंतर त्यांना अडगळीत टाकून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या पक्षाने लालकृष्ण अडवाणी यांसारख्या त्यांच्या दिग्गज नेत्याला तर अडगळीत टाकलेच. शिवाय मुरली मनोहर जोशी यांच्यासह अन्य कित्येक दिग्गज नेत्यांनाही अडगळीत टाकून दिले असल्याचे पाटकर म्हणाले. गेल्या दोन वर्षांपासून मिरामार येथे बांधण्यात येत असलेल्या मनोहर पर्रीकर यांच्या समाधीचे रखडलेले काम पाहिल्यास त्यांचा वारसाही पक्षाला पुढे न्यायचा नाही हे सिद्ध होत असल्याचे पाटकर म्हणाले.
मोप येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देशात गेल्या ८ वर्षांतच सगळा विकास झाल्याचे आणि त्याआधी ६७ वर्षे देशात कोणताही विकास झाला नाही, तसेच कॉंग्रेस पक्षाच्या राजवटीत काही लोकांचे तुष्टीकरण तेवढे झाले, असा जो दावा केला, तो अमित पाटकर यांनी काल खोडून काढला.
जेव्हा देश स्वतंत्र झाला, तेव्हा ब्रिटिश देशातील सगळी संपत्ती लुटून घेऊन गेले होते; पण तरीही तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डगमगून न जाता मोठ्या धैर्याने या परिस्थितीचा सामना तर केलाच शिवाय देशात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था उभारल्या, अवकाश संशोधनावर भर दिला, देशात हरित क्रांती घडवून आणली, देशात कृषी संस्था स्थापन केल्या. या विकासकामांची यादी द्यायची झाल्यास त्यासाठी शेकडो पाने खर्ची घालावी लागतील, असेही पाटकर म्हणाले.
रविवारी मोप विमानतळाच्या उद्घाटनासाठी भाजप सरकारने राज्यभरातील लोकांना कार्यक्रम स्थळी नेले खरे; पण त्यांना आत प्रवेश न देताच परत पाठवण्याचे जे कृत्य केले, त्याचा कॉंग्रेस पक्ष निषेध करीत असल्याचे पाटकर म्हणाले. लोकांना विमानतळाचे टर्मिनल दाखवण्यास नेले होते, तर त्यांना आत प्रवेश न देताच का परत पाठवण्यात आले, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी पाटकर यांनी यावेळी केली.
विरोधकांना का डावलले? : अमित पाटकर
मोप विमानतळाच्या उद्घाटनाच्या आमंत्रण पत्रिकेवर दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे नाव न घालून भाजप सरकारने विरोधकांचा अपमान केला असून, सरकारच्या या वृत्तीचा कॉंग्रेस पक्ष निषेध करीत असल्याचे काल अमित पाटकर यांनी सांगितले. सदर कृतीद्वारे भाजप सरकारने केवळ विरोधकांचाच नव्हे, तर गोव्यातील जनतेचाही अपमान केल्याचे पाटकर म्हणाले.
जमीनमालकांना अजून नुकसानभरपाई का नाही?
मोप विमानतळाचे उद्घाटन केले खरे; मात्र या विमानतळासाठी ज्या जमीनमालकांनी आपल्या जमिनी दिल्या, त्यांना अजून नुकसानभरपाई का देण्यात आलेली नाही, याचे उत्तर सरकारने द्यायला हवे, अशी मागणी अमित पाटकर यांनी केली.