- वृंदा मोये ( म्हापसा)
दिवसभरातील कामाचा ताण आणि शारीरिक दगदग यातून सुटका मिळवण्यासाठी घरातील जाणत्या लोकांची रवानगी वृद्धाश्रमांमध्ये करण्यात आली आणि नकळतपणे घरातील मुलाबाळांवर याचे पडसाद उमटू लागले.
प्राचीन काळापासून महिलांवर होणार्या अनेक अन्यायकारक चालिरितींवर बंदी आणून समाजात क्रांतिकारक बदल घडविण्यात अनेक समाजसुधारक मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले. सती प्रथा, बालविवाह असे अनेक अघोरी प्रकार संपूर्णकः संपुष्टात आले. स्त्री शिक्षणासाठी ज्ञानाची अनेक कवाडे खुली झाली आणि यातूनच स्त्रीविस्ताराच्या अनेक कक्षा रुंदावत गेल्या. अनेक क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी उत्तुंग भरारी घेतली. विज्ञान, साहित्य, उद्योग, शिक्षण, खेळ, राजकारण अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये स्त्रीने जगाच्या नकाशावर आपली नाममुद्रा उमटविली.
देशभरातून वाढत्या महागाईच्या काळात संसाराचा रथ चालविण्यासाठी अर्थार्जन करून स्त्रिया पुरुषांच्या खांद्यावरील भार हलका करू लागल्या. नोकरीनिमित्त दिवसभर घराच्या बाहेर राहणं स्त्रीसाठी अनिवार्य होऊ लागलं आणि साहजिकच कुटुंबव्यवस्थेवर याचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवू लागला. नोकरी आणि संसार या दोन्ही आघाड्या पेलताना तिची तारेवरची कसरत सुरू झाली. ‘मी आणि माझा नार्या’ किंवा ‘हम दो हमारे दो’ ही संकल्पना जनमानसात रुजू लागली आणि यातूनच विभक्त कुटुंबपद्धती उदयास आली. घरातील वडिलधार्या मंडळींची अडचण होऊ लागली. दिवसभरातील कामाचा ताण आणि शारीरिक दगदग यातून सुटका मिळवण्यासाठी घरातील जाणत्या लोकांची रवानगी वृद्धाश्रमांमध्ये करण्यात आली आणि नकळतपणे घरातील मुलाबाळांवर याचे पडसाद उमटू लागले.
मुलांकडे लक्ष देण्यासाठी आईवडिलांना अजिबात वेळ मिळेनासा झाला. त्यामुळे मुलांची योग्यरीत्या वाढ होण्यासाठी आवश्यक असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींना मुलांना मुकावे लागले. यामध्ये मुलांचे आरोग्य, संतुलित आहार, तसेच प्रेम, जिव्हाळा, वात्सल्यपूर्ण मायेचा, आपुलकीचा स्पर्श या सगळ्या गोष्टी ओघाने आल्या. घरांना कुलपं ठोकून ऑफिसला जाताना मुलांची रवानगी पाळणाघरांमध्ये होऊ लागली. तान्ही बाळंसुद्धा याला अपवाद ठरली नाहीत. तेथील आया, नोकर-चाकर यांच्या देखरेखीखाली मुलं मोठी होऊ लागली. मुलांमध्ये संवेदनशीलतेचा अभाव जाणवू लागला. आजीआजोबांचे अनुभवाचे बोल, त्यातून होणारी आजार-विचारांची देवाण-घेवाण, त्यांचं मार्गदर्शन, दिवेलागणीची वेळ झाल्यानंतर देवघरात बसून स्तोत्रं, प्रार्थना म्हणणं संस्कारशील गोष्टी सांगणं-ऐकणं हे सगळं चित्र दिसेनासं झालं आणि आजच्या ग्लोबलायझेशनमुळे आपला एकटेपणा घालविण्यासाठी मुलांनी मोबाईल्स, टीव्ही, इंटरनेट, व्हॉट्सऍप, फेसबुक, पबजी गेम्स यांसारख्या माध्यमांशी जवळीक साधली. आपली मुलं कोरडी, रुक्ष बनत चालली.
म्हणूनच वाटतं आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात आपण कितीही बदलायचा प्रयत्न केला तरी पूर्वीची संयुक्त कुटुंबपद्धती ही आपल्या मुलाबाळांच्या दृष्टीने मोठं वरदानच होतं. नोकरीवर गेलेल्या आईवडिलांच्या मागून आपल्या लहान मुलाबाळांकडे लक्ष देणारे अगदी आपले जवळचे कोणी आहे ही भावना व ठाम विश्वास मनामध्ये असायचा.
स्त्रियांनी आज कितीही उच्च शिखरं गाठलेली असली तरी तिला स्वतःला मूल झाल्यानंतर ती फक्त एक ‘आई’ असते, हे विसरून चालणार नाही. म्हणून आजच्या तरुण पिढीने आपल्या आईवडिलांना समजून घेऊन म्हातारपणात त्यांना वृद्धाश्रमाची वाट न दाखवता आपल्याच कुटुंबात सामावून घेतल्यास पुढील पिढीवर चांगले संस्कार घडून सुशिक्षित होण्याबरोबरच ती पिढी सुसंस्कारितही होईल यात तिळमात्रही शंका वाटत नाही.