>> सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू
आशियाई खेळांमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गट कुस्तीत भारताच्या विनेश फोगाटने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत विनेशने जपानच्या इरी युकी या प्रतिस्पर्ध्यावर ६-२ अशी मात केली. या विजयासह विनेश आशियाई खेळांमध्ये कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू होण्याचा मान मिळविला. पहिल्या डावात विनेशने बेसावध असलेल्या जपानच्या प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्याचा प्रयत्न केला. विनेशचा हा प्रयत्न अयशस्वी झाला असला तरीही यातून तिने ४ गुणांची कमाई करत आघाडी मिळवली. मात्र दुसर्या डावात अखेरच्या सेकंदांमध्ये विनेशने जपानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला चीतपट करत सामना आपल्या नावावर केला.
तत्पूर्वी, विनेशने उपउपांत्यपूर्व फेरीत चीनच्या सून यानान हिचा ८-२ असा फडशा पाडत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले होते. या सामन्याच्या पहिल्या डावात केवळ २-० अशी निसटती आघाडी घेतल्यानंतर विनेशने दुसर्या डावात ६ गुणांची घसघशीत कमाई करत प्रतिस्पर्ध्याला लोळवले. ‘अंतिम ८’मध्ये तर विनेशने कमाल करताना कोरियाच्या किम ह्यूंगजो हिला काडीमात्र संधी दिली नाही. पहिल्या डावात सहा व दुसर्या डावात पाच गुणांची लयलूट करत तिने आपली आक्रमकता दाखवली. आपला हाच धडाका कायम राखताना तिने उपांत्य फेरीतील लढतही एकतर्फी होणार याची दक्षता घेतली. या फेरीत तिने उझबेकिस्तानच्या याखशिमुरातोवा दौलतबेक हिला १.१५ मिनिटांत नॉकआऊट करत १०-० असा विजय संपादन केला.