विनाअनुदानित विद्यालयांची शैक्षणिक शुल्क वाढ मागे

0
112

शिक्षण खात्याने विनाअनुदानित विद्यालयांची शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठीची शुल्क वाढ मागे घेतली आहे.
या संबंधीचे परिपत्रक शिक्षण खात्याच्या संचालिका वंदना राव यांनी काल जारी केले आहे. राज्यातील विनाअनुदानित विद्यालयाकडून स्वीकारण्यात येणार्‍या शैक्षणिक शुल्काबाबत अनेक पालकांनी शिक्षण खात्याकडे तक्रारी केल्या होत्या. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर पालकांना पूर्वसूचना न देता शुल्क वाढ करण्यात आल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

शिक्षण खात्याच्या अधिकार्‍यांनी विनाअनुदानित विद्यालयांचे पदाधिकारी व पालकांशी शुल्क वाढीवर चर्चा केली आहे. राज्यातील काही विनाअनुदानित शिक्षण संस्थांनी कोविड महामारी पूर्वी तर, काही संस्थांनी कोविड महामारी सुरू झाल्यानंतर शिक्षण खात्याकडून शुल्क वाढीला मान्यता घेतली आहे. तथापि, शिक्षण खात्याने वर्ष २०२० ते २०२१ या वर्षात शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. शुल्कवाढ करण्यासाठी देण्यात आलेली मान्यता मागे घेतली जात असल्याचे संचालिका राव यांनी म्हटले आहे.

राज्यातील विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण संस्थांनी वर्ष २०२०-२१ साठी शुल्कवाढ करू नये. तर, मागील वर्ष २०१९-२० साठी आकारलेल्या शुल्काची आकारणी करावी. विनाअनुदानित विद्यालयांनी वर्ष २०२०-२१ साठी ऍक्टिव्हिटी शुल्काची आकारणी करू नये. वाहतूक सुविधा सुरू झाल्याशिवाय वाहतूक शुल्काची आकारणी करू नये, असेही परिपत्रकात म्हटले आहे.