>> मतदारांनी दाखवला उत्साह; उत्तर गोव्यात ७९ टक्के, तर दक्षिण गोव्यात ७८ टक्के मतदानाची नोंद; साखळीत सर्वाधिक मतदान
गोवा विधानसभेच्या ४० मतदारसंघांसाठी काल ७८.९४ टक्के मतदान झाले. टपाल मतपत्रिका मिळून एकूण मतदान अंदाजे ८० टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. साखळी मतदारसंघात सर्वाधिक ८९.६४ टक्के, तर सर्वांत कमी म्हणजे ७०.०२ टक्के मतदान बाणावली मतदारसंघात झाले. उत्तर गोव्यात ७९ टक्के, तर दक्षिण गोव्यात ७८ टक्के मतदान झाले. काही ठिकाणी झालेले किरकोळ वादावादीचे प्रकार सोडल्यास एकूण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यंदा ४० मतदारसंघांत एकूण ३०१ उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य काल ‘ईव्हीएम’मध्ये सीलबंद झाले असून, आता निकाल १० मार्चला स्पष्ट होणार आहे. दरम्यान, २०१७च्या विधानसभा निवडणुकीत ८३ टक्के मतदान झाले होते.
काल सकाळी ७ वाजल्यापासून राज्यात सर्वत मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदानासाठीचा उत्साह दिसून येत होता. लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडताना दिसून येत होते. त्यात नवमतदारांसह युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा देखील समावेश होता. सकाळच्या तुलनेत दुपारनंतर मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले. दुपारनंतर मतदानाला वेग आल्याचे चित्र सर्वच मतदारसंघांत पाहावयास मिळाले. संध्याकाळी ६ वाजल्यानंतर बहुतांश मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या होत्या. त्यामुळे ६ नंतरही रांगेत उभ्या असलेल्या या मतदारांना निवडणूक अधिकार्यांनी क्रमांक नोंदवून चिठ्ठ्या दिल्या. त्यानंतर या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दाबोळी, मुरगाव, नावेली, फोंडा, मडगाव या ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रकार घडले. मात्र उर्वरित ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली.
सत्ताधारी भाजप, कॉंग्रेस, मगो, गोवा फॉरवर्ड, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, आप, रिव्होल्युशनरी गोवन्स, शिवसेना, संभाजी ब्रिगेड, जय महाभारत व गोंयचो स्वाभिमान असे १२ पक्ष निवडणूक रिंगणात असून, या सर्व पक्षांचे आणि उमेदवारांचे भवितव्य १० रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघासह सांगे, केपे, काणकोण, मांद्रे, पेडणे, डिचोली, मये, पर्ये, प्रियोळ, मुरगाव, सावर्डे आदी विविध मतदारसंघांत विक्रमी मतदान झालेले असून, त्याचा फायदा सत्ताधार्यांना होईल की विरोधकांना याविषयी काल राज्यभरातील नागरिकांमध्ये चर्चा होती.
खास करून संपूर्ण गोव्याचे लक्ष मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघाकडे लागून राहिले आहे. तेथे डॉ. सावंत पुन्हा एकदा विजयी होतात की कॉंग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलानी हे त्यांचा पाडाव करतात, याविषयी मतदारांमध्ये उत्सुकता आहे. मांद्रे मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे विजयी होतात का, याबाबत सुद्धा मतदारांमध्ये उत्सुकता आहे. तसेच उत्पल पर्रीकर हे निवडणूक रिंगणात उतरल्याने देशभरात चर्चेचा विषय बनलेल्या पणजी मतदारसंघाच्या निकालाकडे देखील मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
किरकोळ वादावादीच्या घटना
- दाबोळी : नवेवाडे येथे एका मतदान केंद्रानजीक भाजप समर्थक पैसे वाटत असल्याची कॉंग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची तक्रार. तक्रारीनंतर भरारी पथकाकडून भाजप समर्थकाची झाडाझडती. २५ हजार रुपयांचा गठ्ठा जप्त. त्यानंतर भाजप-कॉंग्रेस समर्थकांत बाचाबाची.
- मुरगाव : सर्वेश होबळे या कॉंग्रेस समर्थकाकडून ५० हजार रुपये जप्त. भाजप महिला कार्यकर्तीने कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्तीशी हुज्जत घातल्याने वातावरण तंग.
- मडगाव : मोतीडोंगरावरील मतदान केंद्रावर उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर व दिगंबर कामत यांचे कार्यकर्ते भिडले. बाबू आजगावकर यांच्याकडून परिसरातील मतदारांना धमकावण्याचा प्रयत्न. वातावरण तीन तास तंग.
- नावेली : तृणमूलच्या उमेदवार वालंका आलेमाव यांचे बंधूने लोकांना व आपच्या उमेदवार प्रतिमा कुतिन्हो यांना अपशब्द वापरल्याने काही काळ तणाव. तसेच वालंका आलेमाव यांची बहीण पैसे वाटत असल्याची प्रतिमा कुतिन्हो व कॉंग्रेसचे उमेदवार आवेर्तान फुर्तादो यांची तक्रार.
- फोंडा : मगोचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांच्याविरुद्ध एका युवकास व महिलेला धक्काबुक्की केल्याची तक्रार. गुन्हा नोंदवला.
१७ मतदारसंघात ८० टक्क्यांहून अधिक मतदान
राज्यातील १७ मतदारसंघात काल ८० टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली. राज्यात सर्वाधिक मतदानाची नोंद साखळी मतदारसंघात झाली. दक्षिण गोव्यातील प्रियोळ (८७.७३), शिरोडा (८२.६६), मडकई (८१.२७), मुरगाव (८१.२८), केपे (८३.४५), कुडचडे (८०.२९), सावर्डे (८६.४२), सांगे (८५६९.०४), काणकोण (८२.११), तर उत्तर गोव्यातील मांद्रे (८४), पेडणे (८३), डिचोली (८७.८४), थिवी (८०.२५), मये (८४.३३), साखळी (८९.६४), पर्ये (८६.०४), वाळपई (८२) या मतदारसंघात ८० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले.
दग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह राज्यातील दिग्गज नेत्यांनी सोमवारी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी देखील सकाळच्या सत्रात मतदान केले. तसेच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार ऍड. अमित पालेकर, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, पणजीतील अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर, मांद्रेतील अपक्ष उमेदवार लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या अनेक नेत्यांनी सकाळच्या सत्रातच मतदानाचा हक्क बजावला.
मतदारांच्या सुरक्षेसाठी हातमोज्याची सोय
कोविड महामारीचे संकट टळलेले नसल्याने मतदानाच्या वेळी प्रत्येक मतदाराला खबरदारीचा उपाय म्हणून उजव्या हातात घालण्यासाठी प्लास्टिकचा हातमोजा (हँडग्लोव्ह्ज) देण्यात आला. निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच मतदारांनी हातमोजा घालून मतदान केले. तसेच मतदानाला येताना मास्क घालायला विसरलेल्या किंवा मास्क न घालता आलेल्या मतदारांना मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच सॅनिटायझरची देखील सोय करण्यात आली होती.
मतदानासाठी राज्यभरातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवल्याबद्दल आपण त्यांचे आभार मानतो. तसेच निवडणुकीसाठी झटलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचेही आपण आभार मानतो. मतदारांचा आशीर्वाद आणि पाठिंब्याने भाजप नक्कीच २२ हून अधिक जिंकल.
डॉ. प्रमोद सावंत,
मुख्यमंत्री.
लोकांना बदल हवा असून, हा बदल घडवून आणण्यासाठी लोकांनी मतदान केले आहे. त्यामुळे राज्यात कॉंग्रेस व गोवा फॉरवर्ड युतीचे सरकार निश्चित सत्तेवर येईल.
- विजय सरदेसाई,
अध्यक्ष, गोवा फॉरवर्ड
भाजप नेते वल्लभ साळकर यांचे वाहन अज्ञाताने पेटवले
डिचोली येथील भाजपचे ज्येष्ठ नेते वल्लभ साळकर यांच्या वाहनाला रविवारी मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास अज्ञाताने आग लावली. त्यात संपूर्ण गाडीचे मोठे नुकसान झाले. अग्निशामक दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. या प्रकरणी वल्लभ सळकर यांनी पोलीस तक्रार नोंदवली आहे. या प्रकाराचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार राजेश पाटणेकर, डॉ. चंद्रकांत शेटये, नरेश सावळ यांनी निषेध नोंदवला आहे.