>> आदिवासी कल्याण मंत्री गावडेंची माहिती
गोवा विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील आदिवासी समाजासाठी कायद्यानुसार चार जागा राखीव ठेवण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
आदिवासी समाजातील नागरिकांच्या उटा या संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आल्तिनो पणजी येथे भेट घेऊन आदिवासी समाजाला विधानसभा निवडणुकीत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. या शिष्टमंडळात आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांचा समावेश होता.
राज्यातील आदिवासी समाजाला विधानसभा निवडणुकीत कायद्यानुसार १२ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. राज्य विधानसभेच्या ४० जागांपैकी ४ जागा आदिवासी समाजातील लोकांसाठी राखीव ठेवण्याची गरज आहे. आत्तापर्यंत पंचायत. नगरपालिका, जिल्हा पंचायतीमध्ये आदिवासी समाजाला आरक्षण दिले जात आहे. केवळ गोवा विधानसभेच्या निवडणुकीत अद्यापपर्यंत आरक्षण देण्यास सुरुवात करण्यात आलेली नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत आदिवासी समाजाला आरक्षण देण्याची विनंती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे करण्यात आली आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.
दरम्यान, उटाच्या शिष्टमंडळाने भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची भेट घेऊन आदिवासी समाजाला राजकीय आरक्षण मिळवून देण्याची विनंती करणारे निवेदन सादर केले आहे.