विधानसभेत चर्चेविना अंदाजपत्रक संमत

0
143

>> विरोधकांचा गदारोळ, घोषणाबाजी

कोणत्याही चर्चेशिवाय सरकारने २०२०-२१ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प संमत करू नये तसेच कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर विधानसभेत चर्चा करावी या दोन्ही मागण्या सभापती राजेश पाटणेकर यांनी अमान्य केल्यानंतर काल कॉंग्रेस, गोवा फॉरवड व मगो या विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानसभेत गदारोळ केला.

विधानसभेत कोविडवर चर्चा घडवून आणावी या मागणीसाठी कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड, मगो व अपक्ष आमदार रोहन खंवटे यानी सभापतींसमोर स्थगन प्रस्ताव मांडला होता. तो फेटाळण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसेच कॉंग्रेसचे प्रतापसिंह राणे, रवी नाईक, लुईझिन फालेरो, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स तसेच गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई, विनोद पालयेकर, जयेश साळगांवकर, मगोचे सुदिन ढवळीकर व अपक्ष रोहन खंवटे यांनी सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत जाऊन गदारोळ घालत घोषणाबाजी केली.
दिगंबर कामत, लुईझिन फालेरो, विजय सरदेसाई व रोहन खंवटे यांनी कोविडवर चर्चेची मागणी केली.

यावेळी हस्तक्षेप करत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी, आपण स्वतः तसेच आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे कोविडसंबंधी बोलण्यास तयार आहोत. पण तत्पूर्वी अंदाजपत्रक संमत करू द्या, असे विरोधकांना सांगितले. पण त्यांनी ते ऐकून घेण्यास नकार दिल्यानंतर सभापतीनी वरील सर्व विरोधी आमदारांना सभागृहातून बाहेर काढले. नंतर २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक कोणत्याही चर्चेशिवाय संमत करण्यात आले.

११ विधेयके संमत
गोवा विधानसभेच्या एक दिवसीय अधिवेशनात काल विक्रमी कामकाज आटोपण्यात आले. विरोधी बाक रिकामे असताना काल राज्या विधानसभेत ११ सरकारी विधेयके मंजूर करण्यात आली. मात्र, बहुचर्चित पंचायत राज दुरुस्ती विधेयक विधानसभेत मांडण्यात आले नाही. सर्व सरकारी खात्यांच्या अनुदानित मागण्यांही कोणत्याही चर्चेशिवाय संमत करण्यात आल्या. त्याशिवाय प्रश्‍नोत्तराचा तासही झाला. मात्र, त्यावेळी विरोधक सभागृहात हजर होते.