विधानसभेतील प्रश्‍नांची उत्तरे ४८ तास अगोदर देण्याचे सभापतींचे निर्देश

0
563

राज्य विधानसभेत विचारल्या जाणार्‍या प्रश्‍नांची उत्तरे आमदारांना ४८ तास अगोदर देण्याचे निर्देश सभापती राजेश पाटणेकर यांनी मुख्य सचिवांना काल दिले.
राज्य विधानसभेत विचारलेल्या प्रश्‍नांना ४८ तासांपूर्वी उत्तर देण्याची सूचना कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे. तथापि, प्रश्‍नांची उत्तरे निर्धारित वेळेत मिळत नाहीत, अशी तक्रार विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी विधानसभेत बोलताना काल केली.
आपल्या एका प्रश्‍नाला उत्तर देण्यात आले आहे. परंतु, उत्तर स्पष्टपणे वाचता येत नाही, असे विरोधी पक्षनेते कामत यांनी सभापती पाटणेकर यांच्या निदर्शनास आणून दिले. आपणाला मिळालेले उत्तर वाचण्यासाठी स्पष्ट नसल्याने आपण प्रति प्रश्‍न विचारू शकत नाही. त्यामुळे आपला प्रश्‍न पुढे ढकलावा, अशी मागणी कामत यांनी केली.

आमदारांच्या प्रश्‍नाचे उत्तर मोठे असल्याने ते सीडीच्या माध्यमातून दिले जाते. विरोधी पक्षनेत्यांचा प्रश्‍न पुढे ढकलला जाणार नाही. त्यांनी प्रतिप्रश्‍न विचारावेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. आपणाला प्रश्‍नाचे उत्तर ४८ तासांपूर्वी मिळालेले नाही. याबाबत संबंधितांकडे ई मेलच्या माध्यमातून तक्रारसुद्धा केली आहे. त्यामुळे प्रश्‍न पुढे ढकलावा, अशी मागणी कामत यांनी लावून धरली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी प्रश्‍न पुढे ढकलण्यास नकार दर्शवून विरोधी पक्षनेते कामत यांना उपप्रश्‍न विचारण्याची विनंती केली. विरोधी पक्षनेते कामत यांनी सभापतीकडून सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण केले जात नाही, असा आरोप करून त्या निषेधार्थ आपण उपप्रश्‍न विचारत नसल्याचे सांगितले.